तिढा सुटेना...प्रथम महिला मुख्यमंत्रीचा मान द्या : शेतकरी कन्येची राज्यपालांना पत्र 

धनंजय सोनवणे
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

साक्री ः विधानसभेचा निकाल लागून दहा दिवस उलटून देखील अद्याप मुख्यमंत्री व नवीन सरकार मिळू शकलेले नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असल्याने बळीराजादेखील मोठ्या अडचणीत सापडला आहे. सरकार अभावी शेतकरी देखील मदतीपासून वंचित राहत आहेत. या परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत आपल्याकडे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवला जावा; अशी मागणी दातर्ती (ता.साक्री) येथील शेतकरी कन्या ज्योती नंदकिशोर सूर्यवंशी यांनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप- शिवसेनेत रस्सीखेच दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांत एकमत होत नाही. हा तिढा सोडवून मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवावा अशी मागणी ज्योती सुर्यवंशी या शेतकरी कन्येने केली आहे. शुक्रवारी म्हणजे 1 नोव्हेंबरला मुंबई येथे राजभवनात राज्यपालांची भेट घेत सौ. सूर्यवंशी व त्यांचे पती नंदकिशोर सूर्यवंशी यांनी हे मागणीचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले. काही दिवसांपूर्वी बीड येथील एका शेतकऱ्याने अशाच पद्धतीने मुख्यमंत्री करण्याची मागणी राज्यपालांकडे केल्यानंतर दातर्ती येथील एका शेतकरी कन्येने पुन्हा अशीच मागणी केल्याने याचे मोठी चर्चा होत आहे. सौ. सूर्यवंशी या विधी शाखेच्या पदवीधर असून, गेल्या काही वर्षांपासून त्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. 

काय आहे पत्रात 
ज्योती सूर्यवंशी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले, आहे की सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे सबंध राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य वर्ग व्याकूळ व चिंताग्रस्त आहे. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्रीपदावर एकमत होत नसल्याने शिवसेना व भाजप यांच्यात सत्तासंघर्षाचा तिढा निर्माण झाला आहे. राज्यात शेतकरी, सर्वसामान्य नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेले असताना या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात यावा व राज्याला प्रथम महिला मुख्यमंत्री म्हणून महिला वर्गास न्याय देण्यासाठी आपल्याकडे मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात यावा. तरी भाजप- शिवसेना युतीतील मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटेपर्यंत आपल्याकडे पदभार देण्यात यावा; जेणेकरून आपण शेतकरी, सर्वसामान्य जनता, सुशिक्षित बेरोजगार, महिला वर्ग आदींच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करू व सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. अशी मागणी पत्रातून ज्योती सूर्यवंशी यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news first woman cm chance jyoti surywansi rajypal later