खवय्यांच्या पर्वणीला आजपासून सुरवात 

representational image
representational image

 
नाशिक : "मनपसंत खाणे, सोबत सुमधुर गाणे' या संकल्पनेवर आधारित "सकाळ फूड फेस्टिव्हल' या खवय्यांच्या पर्वणीला बुधवार(ता. 14)पासून गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरवात होत आहे. सकाळी अकरापासून या खाद्य महोत्सवाला सुरवात होणार आहे. सायंकाळी पाचला औपचारिक उद्‌घाटनाचा कार्यक्रम होईल. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. या वेळी मान्यवरांची उपस्थिती असेल. रविवारपर्यंत खवय्यांना शाकाहारी व मांसाहारी अशा विविध खाद्यपदार्थांवर ताव मारण्याची संधी उपलब्ध असेल. 

"सकाळ फूड फेस्टिव्हल'च्या माध्यमातून दर वर्षी चमचमीत पदार्थांची झणझणीत मेजवानी नाशिककरांना चाखायला मिळते. एकाहून एक असे चविष्ट पदार्थ खायला मिळत असल्याने खवय्यांना "सकाळ फूड फेस्टिव्हल'ची प्रतीक्षा असते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी बुधवारी (ता. 14) या महोत्सवाला सुरवात होत असून, खवय्यांना भरपूर पर्याय या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत. 

चायनीज पदार्थांसह पिठलं-भाकरी, मांडे (पुरणपोळी), कुळिथाचे शेंगुळे, भरीत या अस्सल मराठमोळ्या पदार्थांसह चाट भांडार, दाबेली, सॅण्डविच असे भरपूर पर्याय उपलब्ध असतील. मांसाहारी पदार्थांत वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी, कोंबडीवडे, मटण-रस्सा, विविध प्रकारचे फिश, सुरमई, पापलेट, बांगडा, सुके मासे, कबाब आदींवर ताव मारता येईल. 

खवय्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महोत्सवाच्या ठिकाणी संगीतमय कार्यक्रमाही होणार आहे. त्यासाठी इंटरनॅशनल म्युझिक लव्हर्स यांचे सहकार्य लाभत आहे. इतकेच नव्हे, तर "सकाळ फूड फेस्टिव्हल'ला भेट देणाऱ्यांपैकी काही भाग्यवंतांना सोनी पैठणीतर्फे आकर्षक पैठणी जिंकण्याची संधीदेखील उपलब्ध असणार आहे. "सकाळ फूड फेस्टिव्हल' रविवार (ता. 18)पर्यंत सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत खुला असेल. महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

दुपारी 4 पर्यंत मोफत प्रवेश 
सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत खवय्यांना "सकाळ फूड फेस्टिव्हल'मध्ये मोफत प्रवेश दिला जाईल. दुपारी चारनंतरचे प्रवेशशुल्क दहा रुपये असेल. "सकाळ तनिष्का' व "मधुरांगण' सदस्यांना मोफत प्रवेश राहणार असून, त्यासाठी ओळखपत्र असणे बंधनकारक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com