वरणगावला सेंट्रल बँकेत गोळीबार 

वरणगावला सेंट्रल बँकेत गोळीबार 

वरणगावला सेंट्रल बँकेत गोळीबार 

वरणगावः वरणगाव येथील सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षकाकडून ट्वेल बोअरच्या बंदुकीतून गोळी सुटल्याने तीन महिलांसह एक पुरुष जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेने वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरणगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 
येथील सेंट्रल बँकेत दैनंदिन कामकाज सुरू असताना सुरक्षा रक्षक लालचंद जनार्दन चौधरी (वय ५५, रा. भुसावळ) नेहमीप्रमाणे बँकेच्या मुख्य द्वाराजवळ बसलेले असताना खांद्यावरील बंदूक खाली सरकून जमिनीवर पडली. बंदूक उचलताना बंदुकीतून एक गोळी बाहेर पडली. ती शेजारी बसलेल्या कमलाबाई लोहार (वय ५५, रा. तळवेल) यांच्या दोन्ही पायाला छेदत, बाजूला बसलेल्या शोभा प्रकाश माळी यांच्या डाव्या पायाला चाटून कॅश काउंटर जवळ उभे असलेल्या कमलाबाई सोपान चौधरी (वय ६५), राधेशाम जसवाल (वय ४८) यांच्या डाव्या पायाला लागून बॅंकेचे व्यवस्थापक यांच्या केबीनचा काच फोडून आत शिरली. यामुळे बँकेत एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले. जखमींना त्वरित ग्रामीण रुग्णालयात हालविण्यात आले. 
या घटनेची माहिती बँकेचे व्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता यांनी विभागीय कार्यालयातील एस. बी. सिंग व लीड बँक मॅनेजर अरुण प्रकाश यांना दिली असता त्यांनी तात्काळ वरणगाव सेंट्रल बँक गाठत घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच जखमींना उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील यावेळी दिले. 

पोलिसांनी घेतली धाव 
घटना घडताच बँकेसमोर आवाजाने गर्दी झाली होती. दरम्‍यान वरणगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार योगेश पाटील, नागेंद्र तायडे, सुनील वाणी, राहुल येवले, गणेश शेळके, योगेश कुळकर्णी आदींनीही धाव घेत जमावाला शांत केले. गोळीबारानंतर बँकेतील व्यवहार ठप्प असून पोलिसांकडून पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पोलीस अधीक्षकांची भेट 
पोलिस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांनी वरणगाव सेंट्रल बँकेत दुपारी चारच्या सुमारास भेट दिली. त्‍यांनी घटनेची माहिती जाणून घेत मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय देशमुख, साहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे यांना चौकशीचे आदेश दिले. 
.... 
कोट 
सीसी टीव्ही फुटेज तपासणार 
सेंट्रल बँकेत घडलेली घटना नेमकी कशी घडली यासाठी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज चेक केले जातील. यासाठी बँकेतील सीसीटीव्‍ही फुटेज तज्‍ज्ञ यांना बोलवण्यात आले आहे, ते आल्यानंतर खुलासा होणार आहे. 
-संजय देशमुख 
उपविभागीय अधिकारी 
...................
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com