शंभर ट्के घरपट्टी, नळपट्टी भरा, आणि वर्षभर मोफत दळण दळा !

दगाजी देवरे
Friday, 21 August 2020

धमनार रस्त्यावर मूलभूत सुविधेच्या २५१५ योजनेत सोलर यंत्रणेवर चालणारे दहा पथदिवे बसविण्यात आले आहेत.

म्हसदी  : शंभर टक्‍के घरपट्टी व नळपट्टी भरणाऱ्यासाठी वर्षभर मोफत दळण दळण्याची सुविधा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे. ग्रामपंचायतीचा महसूल मिळावा म्हणून हा उपक्रम राबविल्याची माहिती सरपंच कुंदन देवरे व ग्रामविकास अधिकारी श्री.बोरसे यांनी दिली. 

ग्रामपंचायतीची लाखो रुपये घर व नळपट्टीची थकबाकी आहे. सरपंच देवरेसह, उपसरपंच हुसेनाबी पिजांरी, सर्व सदस्य, तत्पर ग्रामविकास बोरसे यांनी विकास कामांचे नियोजन केले आहे. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत घोषित केल्यानुसार पिठाची गिरणी उपक्रम राबविण्यात आला आहे. घर व नळपट्टी नियमित भरा,वर्षभर मोफत दळण दळून न्या असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. 

खासदार गावितांनी केले कौतुक 
गुरूवारी (ता. २०) खासदार डॉ. गावित, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मंगलाताई पाटील यांच्या हस्ते सोलर पथदिवे, मोफत पिठाची गिरणी, ग्रामपंचायतीच्या नुतनीकरणासह विविध विकास कामांचे उद्घाटन केले. खासदार डॉ. गावित यांनी ग्रामीण भागात उपलब्ध मूलभूत सुविधा पाहून समाधान वाटल्याचे सांगितले. धमनार रस्त्यावर मूलभूत सुविधेच्या २५१५ योजनेत सोलर यंत्रणेवर चालणारे दहा पथदिवे बसविण्यात आले आहेत. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवत ग्रामपंचायतीने आदर्शवत काम केल्याचे कौतुक खासदार डॉ. गावित व जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती मंगलाताई पाटील यांनी केले. 

यांची होती उपस्‍थिती 
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य हर्षवर्धन दहिते, विजय ठाकरे, शेतकरी संघाचे सभापती विलासराव बिरारीस, शेवाळीचे गटनेते प्रदीप कुमार नांद्रे, बाजार समितीचे संचालक दीपक जैन, सरपंच कुंदन देवरे, सुधीर अकलाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, सचिव महेंद्र देवरे, संचालक यशवंतराव देवरे, हिंमतराव देवरे, उत्तमराव देवरे, ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे, माजी सरपंच जयश्री देवरे, डॉ. भास्कर देवरे, उत्पल नांद्रे, संध्या पाटील, अविनाश देवरे उपस्थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news gram Panchayat's trick for hundred percenttax collection