#GROUND REPORT-  उमेदवार म्हणतो, मते द्या; ग्रामस्थ म्हणतात, पाणी द्या! 

संपत देवगिरे
शनिवार, 6 एप्रिल 2019

  चांदवड तालुक्‍याचे शेवटचे अन्‌ ओझरखेड कालव्याच्या "टेल'चे गाव म्हणजे वाहेगावसाळ. कालव्याच्या पाण्याच्या राजकारणाचे बळी ठरलेल्या या गावात यंदा माणसांनाच नव्हे, तर जनावरांनाही विकतचे पाणी प्यावे लागते. कोणीतरी सत्ताधारी येईल अन्‌ गावाच्या वेशीवर कालव्यात अडकवलेले पाणी देईल म्हणून ग्रामस्थ डोळे लावून बसलेत. इथे उमेदवार म्हणतो, मते द्या. गाव म्हणते, पाणी द्या, अशी स्थिती आहे. 

  चांदवड तालुक्‍याचे शेवटचे अन्‌ ओझरखेड कालव्याच्या "टेल'चे गाव म्हणजे वाहेगावसाळ. कालव्याच्या पाण्याच्या राजकारणाचे बळी ठरलेल्या या गावात यंदा माणसांनाच नव्हे, तर जनावरांनाही विकतचे पाणी प्यावे लागते. कोणीतरी सत्ताधारी येईल अन्‌ गावाच्या वेशीवर कालव्यात अडकवलेले पाणी देईल म्हणून ग्रामस्थ डोळे लावून बसलेत. इथे उमेदवार म्हणतो, मते द्या. गाव म्हणते, पाणी द्या, अशी स्थिती आहे. 

 
तीस वर्षांपूर्वी दिंडोरीत ओझरखेड धरणाचे काम सुरू झाले. 2004 मध्ये ओझरखेड कालवा झाला. 63 किलोमीटर लांबीच्या या कालव्यावरील वाहेगावसाळ हे शेवटचे गाव आहे. गेल्या सहा वर्षांपासून गावाला खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यात असे तीन रोटेशन सोडले जातात. निम्मे गाव या कालव्यावर अवलंबून आहे. विशेषतः दत्तनगरला फक्त कालव्याचेच पाणी मिळते. यंदा ओझरखेड धरणात पाणी कमी असल्याचे कारण देत या गावाला उन्हाळ्यात रोटेशनच मिळाले नाही. ग्रामस्थांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. कालव्याला पाणी आले. मात्र, सध्या निफाडच्या पिंपळद गावातूनच ते वळवले. काही नागरिक कॅनॉल इन्स्पेक्‍टरला भेटले. त्याला "खूश' केल्यावर शेजारच्या टाळकी गावाला चारी क्रमांक 32 पर्यंत पाणी आले. आता अगदी वेशीवर पाणी आहे. मात्र, सरकारी अधिकारी वाहेगावसाळला पाणी देण्यास तयार नाहीत. तहानलेले ग्रामस्थ रोज सरकारी अधिकारी, नेते, लोकप्रतिनिधींना विनवण्या करतात. मात्र, उन्हाळ्यात विहिरीच्या तळाला अन्‌ प्रशासनातील अधिकाऱ्यांना काही पाझर फुटेना. 
गावात फेरफटका मारला तर अगदी सकाळी दहालाही परिसर रखरखीत असतो. "लगान' चित्रपटात दुष्काळामुळे कर माफ व्हावा म्हणून ग्रामस्थांना क्रिकेटमध्ये ब्रिटिशांना हरवावे लागले होते. स्वतंत्र भारतात येथील ग्रामस्थच प्रशासनापुढे हरले आहेत. गावात 44 गाव पाणीयोजना आहे. त्यात अर्ध्या गावाला पिण्यासाठी पाणी मिळते. उर्वरित गाव व विशेषतः दत्तनगरला शेती, पिण्यासाठी व जनावरांना पाणीच नाही. त्यासाठी विंचूरहून विकत पाणी आणले जाते. शहरात नागरिक प्रतिष्ठा म्हणून विकतचे मिनरलचे पाणी पितात. या गावात पाळीव जनावरांना अन्‌ शेतीलाही विकतचे पाणी घ्यावे लागते. आशियातील मोठी कृषी बाजारपेठ लासलगाव सात किलोमीटरवर, तर निफाड, चांदवड व मनमाड येथून तिन्ही दिशांना 18 किलोमीटरवर आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषदेत जे सत्तेत आहेत ते विकासाचा डांगोरा पिटतात. मात्र, या गावाचे पाणी सरकार अन्‌ प्रशासन वेशीवरच अडवून ठेवते, अशी खंत ग्रामस्थ रतन गांगुर्डे, नवनाथ बोरगडे, माजी सरपंच अरुण न्याहारकर यांनी व्यक्त केली. 
 रोटेशन आम्हाला नियम व नियोजनानुसार मिळाले पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थ पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, प्रशासनाने आमची कोंडी केली आहे. अजून तीन महिने दुष्काळात कसे काढायचे याचीच चिंता वाटते. 
- शोभा न्याहारकर, सरपंच 

पाणीटंचाईने आम्ही त्रस्त आहोत. नुकतीच गावात बैठक झाली. जर सरकार आम्हाला पिण्याचे पाणी देऊ शकत नसेल तर मतदान तरी का करावे, असा प्रश्‍न लोक उपस्थित करतात. त्यावर आमच्याकडे उत्तर नाही. प्रशासनाचे हा प्रश्‍न लवकर सोडवावा. 
- तुकाराम खैरे, उपसरपंच 

साठ किलोमीटरवर पाणी आले. शेवटच्या तीन किलोमीटरवर मात्र अडवले. प्रशासन व अधिकारी गावाचा सहानुभूतीने विचार करीत नाहीत, हीच खरी गावाची व्यथा आहे. 
- निवृत्ती न्याहारकर, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: marathi news GROUND REPORT