#GROUND REPORT: पाणी नको डिझेल घ्या; थोडे नव्हे हवे तेवढे घ्या, पण आपला माणूस खासदार करा! 

residentional photo
residentional photo


... 
काम बंद. शेती बंद. बागा सुकल्या. पोल्ट्री बंद. कारण एकच पाणी नाही. यंदा खूप दुष्काळ आहे. सिन्नरच्या पूर्व भागात फेरफटका मारला तर सगळं रखरखीत आहे. पण युवकांचा, राजकारणाचा रंग माखलेले सो कॉल्ड कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीत आहेत. कोणत्याही पंपावर जा, चिठ्ठी द्या. लगेच गाडीत डिझेल भरून मिळते. थोडक्‍यात सूर आहे "पाणी नाही, डिझेल घ्या. पण आपला माणूस खासदार करा'. शिवार उन्हाने अन्‌ माणूस राजकारणाने पेटला आहे. जमिनीवरचा विचार कोण करतोय? 


सिन्नर तालुक्‍यातील दोडी, नांदूर, भोकणी, सुरेगाव, मऱ्हळ बुद्रुक, मऱ्हळ खुर्द, चारणगाव, फर्दापूर, पांगरी, मिठसागरे, मिरगाव, वावी या सगळ्या भागात फेरफटका मारण्यासाठी वावी-शिर्डी रस्त्यावरून मधले मातीचे रस्ते पायाखाली घातले. हे रखरखीत रस्ते अन्‌ डांबराची कधी गाठभेट झाली की नाही, असा प्रश्‍न पडला. नांदूर ते सुरेगाव, भोकणी हा रस्ता तर मैलभर जाण्यासाठी अर्धा तास लागला एवढा खडबडीत व खड्ड्यांचा. यातील कोणत्याही रस्त्याने जा दर फर्लांगावर पाण्यासाठी प्लॅस्टिकचे ड्रम, टाक्‍या ठेवलेल्या दिसतात. पैसे देऊन शेतकरी जनावरांसाठी त्यात पाणी घेतात. महिला, शेतकरी म्हणतात, "पाणी द्या.' पण पाणी काही मिळत नाही. येथील डाळिंबाच्या बागा सुकल्या आहेत. शेतात काहीच पिकलेले नाही. विहिरी कोरड्याठाक आहेत. शेततळे भकास आहेत. सर्व पोल्ट्रीफार्म बंद आहेत. त्यात जनावरे बांधण्यात आली आहेत. विकत घेऊन जनावरांना पाणी द्यावे लागते. महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्याची सर्वाधिक चिंता. कुठे साखरपुडा, सुपारी, हळद, लग्न समारंभ असले, की झाडून आप्तस्वकीय जमतात. तेवढाच काय तो विरंगुळा अन्‌ सग्यासोयऱ्यांचे हालहवाल विचारण्याची संधी. यात तरुण पिढी सहसा सहभागी झालेली दिसली नाही. ते वेगळ्याच गप्पा अन्‌ राजकारणाच्या रंगात रंगलेले आहेत. ते सगळे सोय पाहून एका रांगेत नेत्यांच्या मागे. चार-सहा जमले की त्यांची चर्चा असते राजकारण; पाणी नव्हे. असे चित्र या सर्व गावांतून दिसले. 
 
जात घटक महत्त्वाचा 
मराठा आणि वंजारी या दोन प्रमुख समाजांत तालुक्‍याची सामाजिक विभागणी झाली आहे, हे वास्तव लपवता येत नाही. प्रत्येकाशी बोलताना ते प्रकट होते. निवडणुकीत हे रंग अधिक गडद होतात. यंदा तालुक्‍याचे माजी आमदार माणिकराव कोकाटे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करीत आहेत. शिवसेनेचे हेमंत गोडसे तालुक्‍यातील सत्ताधारी गटाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ तालुक्‍यातील विविध गटांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्ते न सांगता विभागले गेले. सोयीच्या कळपात सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी पाणी नव्हे, तर आपला गट महत्त्वाचा. त्यामुळे काही समाज नाशिकच्या उमेदवारामागे गेल्याने बहुसंख्याक समाज तालुक्‍याचा खासदार करण्यासाठी नेटाने कामाला लागला आहे, असे साधे त्यांचे गणित आहे. इथे अन्य सर्व प्रश्‍न पुसट झाले आहेत. 
समृद्धी महामार्गाचे काम सुरेगाव भागात सुरू आहे. या रस्त्याच्या सभोवताली वाळवंटात आल्यासारखे वाटते. यंदा या भागात तीव्र दुष्काळ असल्याचे दीपक, दिनेश व योगेश या तरुणानी सांगितले. भोकणी येथे तर डाळिंबाच्या बागाही सुकल्या आहेत. एकाही विहिरीला पाणी नाही. त्यामुळे अडचणी खूप आहेत. अद्याप तीन महिने कसे जाणार, याची चिंता असल्याचे शिवाजी साबळे यांनी सांगितले. अशीच व्यथा मऱ्हळच्या सचिन कुटे यांची होती. निसर्गच कोपला तर त्यावर सरकार तरी काय करणार, असा त्यांचा प्रतिप्रश्‍न होता. निवडणुकीच्या तोंडावर या गंभीर समस्येने ग्रामस्थ त्रस्त आहेत. जयराम कुटे, दत्तू सांगळे, अण्णा पाटील कुटे यांनी परिसरातील अडचणी सांगितल्या. 
 
कार्यकर्त्यांना मोफत डिझेल 

तालुक्‍यात विविध पेट्रोलपंप आहेत. वावी रस्त्यावरील एका पेट्रोलपंपावर विसाव्यासाठी थांबलो. येथे डिझेल टाकण्यासाठी जीपची रांग लागली होती. एक कार्यकर्ता रजिस्टरमध्ये गाडीचा क्रमांक, मालकाचे नाव आणि किती कार्यकर्ते याची संख्या नोंदवून घेत होता. हे चित्र काहीसे वेगळे वाटले. सहज सांगितले, "आमची जीप येते आहे.' त्यावर प्रश्‍न आला, "ही तर आप्पांची यादी आहे. साहेबांचा पंप पुढे आहे.' मग खुलासा झाला. एकाचा उमेदवारी अर्ज, एकाची सभा आहे. दोन्हींची तयारी सुरू आहे. त्यासाठी चिठ्ठी दाखवली की डिझेल भरून मिळते. सायंकाळची "व्यवस्था' स्वतंत्र केलेली होती. तालुक्‍यात पाणी नाही. टॅंकर विकत घ्यावा लागतो. भरलेल्या टाक्‍यांतील पाणी जिवापाड जपावे लागते. सगळे चातकासारखी टॅंकरची वाट पाहतात. उमेदवार त्यावर चकार शब्द काढत नाहीत. असे का? त्यावर कार्यकर्ता म्हणाला, "अहो, पाणी आणायचे कुठुन? त्यापेक्षा डिझेल भरा पाहिजे तेवढे. त्यावरच लोक खूश आहेत.' "डिझेल घ्या भरून अन्‌ तालुक्‍याचा खासदार आणा निवडून!' हे वाक्‍य ऐकून वेदना झाल्या. खरे प्रश्‍न सत्ताधारी अन्‌ राष्ट्रीय पक्षच नव्हे, तर गावातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही नकोसे झालेत. मग दोष तरी कोणाला देणार? तालुक्‍याची स्थिती पाहून संस्कृत सुभाषित स्मरले. 
राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समा । 
राजानमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजाः ।। 
अर्थात, जशी प्रजा असेल त्यांना तसाच राजा मिळतो. राजा जे पाप करील त्याचे समान माप प्रजेच्याही ओंजळीत पडतेच. लोकशाहीत निवडणुका होतात. त्यात विजयी होणाऱ्या, सत्ताधाऱ्यांनाच दोष कसा देणार? त्यांना मतदान तर आपणच करतो ना? मग खरा दोषी कोण?, याचे उत्तर वेदनादायीच आहे. 

आमच्याकडे कोणीही नेत्यांना पाण्याविषयी विचारत नाही. तो सध्या मुद्दाच नाही. कारण या तालुक्‍याचा विकास करायचा तर याच तालुक्‍यातील खासदार हवा, असा मतप्रवाह आहे. त्यादृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. 
- सचिन कुटे, मऱ्हळ. 

तिरंगी लढत आहे. तालुक्‍यात खूप कामे अपेक्षित आहेत. येथे पाण्याचा प्रश्‍न सोडवायचा असेल, तर समृद्धी महामार्गासाठी लागणारे माती, मुरूम, दगड येथील नद्या, नाले, बंधाऱ्यातील वापरले पाहिजे. त्यामुळे जलसंचय क्षमता वाढेल. असे नियोजन करणाऱ्या नेत्यामागे हा तालुका राहील. 
- भगीरथ सांडगे, मऱ्हळ 
............................................ 
सिन्नर तालुक्‍याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक नेते, राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांचा सहभाग राहिला आहे. या संदर्भात लोकांमध्ये राजकारणविरहित दृष्टिकोन आणि विकासाचे महत्त्व रुजले पाहिजे. सध्या तरी पाणीप्रश्‍न महत्त्वाचा आहे. त्यावर राजकारण अटळ आहे. 
- डॉ. झाकिर शेख, वडांगळी 

भोकणी गावात पूर्वी सहा टॅंकर मंजूर होते. सध्या केवळ तीन खेपा होतात. चारा छावणी कुठेही नाही. पाण्याची स्थिती गंभीर आहे. हे प्रशासनावर नियंत्रण राहिले नसल्याचे द्योतक आहे. स्थानिक नेतृत्व त्यात कमी पडले. त्यामुळे हे प्रश्‍न राजकीयदृष्ट्या चर्चेत आहेत. त्याचा परिणाम हमखास होईल. 
- अरुण वाघ, सरपंच, भोकणी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com