सकाळ  ग्राउंड रिपोर्ट -  कसमादेच्या वैभवासाठी  विश्‍वास ठेवायचा कुणावर? 

महेंद्र महाजन
बुधवार, 17 एप्रिल 2019

  कसमादेचे वैभव म्हणून विठेवाडीचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना. एकीकडे कृषी प्रक्रिया उद्योग अखेरचा श्‍वास घेत असताना चांदवड-देवळ्याचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कारखान्याची चाके पुन्हा सुरू केली. त्यामुळे या भागामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. पण गाळप हंगाम बंद पडला. आता ऊस दिला म्हणून गुन्हा केला काय? इथपासून ते उसाचे "बाउन्स' झालेल्या "चेक'चे करायचे काय? तसेच आमचे देणे मिळाले नसल्याने जगायचे कसे? इथपर्यंत प्रश्‍न उपस्थित होऊ लागलेत. हे कमी काय म्हणून कसमादेच्या वैभवासाठी विश्‍वास ठेवायचा कुणावर, हा प्रश्‍न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कळीचा बनलाय. 
..... 

  कसमादेचे वैभव म्हणून विठेवाडीचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना. एकीकडे कृषी प्रक्रिया उद्योग अखेरचा श्‍वास घेत असताना चांदवड-देवळ्याचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कारखान्याची चाके पुन्हा सुरू केली. त्यामुळे या भागामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. पण गाळप हंगाम बंद पडला. आता ऊस दिला म्हणून गुन्हा केला काय? इथपासून ते उसाचे "बाउन्स' झालेल्या "चेक'चे करायचे काय? तसेच आमचे देणे मिळाले नसल्याने जगायचे कसे? इथपर्यंत प्रश्‍न उपस्थित होऊ लागलेत. हे कमी काय म्हणून कसमादेच्या वैभवासाठी विश्‍वास ठेवायचा कुणावर, हा प्रश्‍न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कळीचा बनलाय. 
..... 
कारखान्याचा गाळप हंगाम बंद पडल्यावर उरलेल्या उसाचे करायचे काय, असा प्रश्‍न निर्माण झालेला असताना द्वारकाधीश, रावळगाव कारखान्याने ऊस नेल्याने "जिवावर बेतलेले बोटावर निभावले' अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवळ्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्यांच्या नेमक्‍या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी झालेल्या संवादात गाळप बंद पडलेल्या कारखान्याच्या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्‍न धरणातून बंद पाइपामधून पाणी देण्याच्या हालचालींविषयीचा राग प्रकट झाला. विनोद आहेर, माणिक आहेर, गणेश शेवाळे, रामा पवार, रमेश शेवाळे, दिलीप निकम, लक्ष्मण निकम आदींनी संवादात भाग घेतला. स्वर्गीय डॉ. दौलतराव आहेर यांचा कारखाना चालला पाहिजे, असा आग्रह राहिला. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून आमदार डॉ. राहुल आहेरांनी दिलेल्या शब्दांवर विश्‍वास ठेवून ऊस दिल्याचे शेतकरी सांगत होते. त्याच वेळी 2016-17 आणि 2017-18 या दोन हंगामांचा सहाशे कर्मचाऱ्यांचा पगार अडकला. हा विषय संवेदनशीलपणे हाताळला गेला नाही. 11 नोव्हेंबरला गाळप सुरू झाले. 22 जानेवारीला मागचा आणि पुढचा पगार देऊ, असा दिलेला शब्द पाळला न गेल्याने कामगारांनी संपाचे हत्यार उपसले, असा सारा घटनाक्रम सांगत असताना शेतकऱ्यांनी कामगार उपायुक्तांकडे त्यासंबंधाने करार का केला गेला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. 

विठ्ठल-रुक्‍मिणी-सप्तशृंगी आईची शपथ 
राममंदिरात झालेल्या बैठकीत मागील देणे दिल्यावर कारखाना सुरू करण्याविषयी चर्चा झाली. पण तसे घडले नाही. ऊसतोड कामगारांचे मागील साडेदहा लाखांचे आणि आताचे साडेचौदा लाखांचे देणे थकले अशी व्यथा कारखान्याच्या सभासदाने मांडली. त्याचक्षणी शकुंतला निकम यांच्या नावावर दिलेला दोन लाख 91 हजारांचा चेक "बाउन्स' झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. दुसऱ्या शेतकऱ्यानेसुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला. गाळप हंगाम सुरू करताना विठ्ठल-रुक्‍मिणी-सप्तशृृंगी आईची शपथ घेऊन इतर कारखान्यांपेक्षा एक रुपया उसाला टनाला जादा देण्याचा शब्द दिला गेला. त्यानुसार टनाला दोन हजार 371 रुपये मिळणे अपेक्षित असून, उरलेली रक्कम कधी मिळणार, अशी विचारणा शेतकरी करीत होते. दुकानदार पाच किलो साखर उधार देतो का, असा प्रश्‍न उपस्थित करीत शेतकरी आमच्या उधार घेतलेल्या उसाच्या पैशांचे काय, असे म्हणत शेतकरी संतापाला वाट मोकळी करून देत होते. 

आमदारांनी विरोध करणे अपेक्षित 

चणकापूर धरणातून पाणी आरक्षित केले गेले. पण हे पाणी पाइपामधून न्यायचे म्हणतात. त्यास आमच्या आमदारांनी विरोध करायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त करत असतानाच शेतकरी नदीतून पाणी न्यायला कुणाचा विरोध असण्याचे कारण नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत होते. सरकार गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचा विचार करणार आहे की नाही, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. 
... 
स्थानिक प्रश्‍नांना बगल देण्याबद्दल संताप 

लोकसभा निवडणुकीबद्दल शेतकरी भरभरून बोललेत. आम्ही ही पहिली निवडणूक अशी अनुभवतो आहोत, की स्थानिक प्रश्‍नांना बगल दिली जात आहे, असे सांगत संताप व्यक्त केला जात होता. कोणता विकास केला? विकास केला असता, तर भलत्याच मुद्द्यांवर मते मागण्याची वेळ आली असते का? "अमुक पक्षमुक्त भारत' अशा घोषणा केल्या जातात मग त्या पक्षातील नेत्यांना आयात करताहेत म्हटल्यावर कोणत्या निष्ठेच्या गोष्टी केल्या जाताहेत, असे एकामागून एक प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news GROUND REPORT