हार्ट ऑफ सिटी लाच पडलाय बेशिस्त वाहतुकीचा विळखा 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

आमचे आय.डी.बी.आय बॅंकेते खाते आहे. बॅकेत जाण्याची वेळ आली तर अंगावर काटे येतात. त्या ठिकाणी बॅंकेचा प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर एका रांगेत दुचाक्यांनी रास्ता रोको केलेला असतो. तेथे दुचाकी घेऊन जाणे शक्य नाही. मात्र पायी गेल्यावर बॅंकेत घुसण्यासाठीही रस्ता मुश्‍किलीने काढावा लागतो. 
विक्रम पाटील, नंदुरबार 

नंदुरबार : हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्री मार्केट ते अंधारे हॉस्पिटल रस्त्यावर व्यापारी ,व्यावसायिकांसह नागरीकांचेही वाहन रस्त्यावर पार्कींग केले जात असल्याने या वर्दळीचा रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. त्यातून लहान -मोठे अपघात होत असतात. या परिसरातील बेशिस्त वाहतूक व पार्कींगचा कायमचाच बंदोबस्त होणे आवश्‍यक आहे. 

हेही पहा - जिल्हा रुग्णालयात कैद्यांच्या सरबराईवर शिक्कामोर्तब 

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील रस्तेही आता तोकडे ठरू लागले आहेत. त्यातच बेशिस्त वाहतूक व बेशिस्त पार्कींगची पद्धतीने तर शहरवासीयांची नाके नऊ आली आहे. हा परिसर म्हणजे शहरातील हार्ट सिटी मानला जातो. या परिसरात नगर पालिका इमारत, आमदार कार्यालय, मुख्य बाजारपेठ, विविध बॅंका, पतसंस्था, विविध प्रकारचे व्यापारी व्यावसायिकांचे दुकाने, हॉटेल्स आदी अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. शहरातील हा मुख्य रस्ता आहे. शहरातील मुख्य रक्तवाहिनी असलेल्या या रस्त्यावरूनच शहरातील इतर भागांकडे जाणारे रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. शहरातील प्रतिष्ठित दवाखाने, शाळा-महाविद्यालयांकडे जाण्यासाठीही हाच मुख्य मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. कधी कधी या रस्त्यावरील दोन मिनिटाचे अंतरही पार करणे जिकिरीचे ठरते. 

मानव निर्मित कोंडी 
या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी ही मानव निर्मित आहे. बेशिस्तीने वाहनांची पार्कींग करणे, मनाला पटेल तशा दुचाकी उभी करणे, रस्त्यावरच कार, रिक्षांची पार्कींग करणे या कारणांनी येथे वाहतुकीची कोंडी होते. तसे पाहिल्यास ही कोंडी सुटू शकते. या परिसरातील वाहतूक सुरळीत होऊ शकते, मात्र त्यासाठी या परिसरातील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक व या परिसरात वाहने लावणाऱ्या प्रत्येकाची मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. 

क्‍लिक करा - टॉयलेटमध्ये स्वतःच केली प्रसुती...बाळाला बादलीत सोडून रूममध्ये येवून झोपली

व्यापारी संकुले आहेत मात्र पार्कींग नाही 
या परिसरात मोठ मोठे व्यापारी संकुले उभारले गेले आहेत. काहींनी मधल्या भागात पार्कींगची व्यवस्था केली आहे. मात्र त्या पार्कींगचा उपयोग केला जात नाही. भय्याजी चहावाल्यांचा दुकानापासून तर थेट शास्त्री मार्केटपर्यंत दोन्ही बाजूला मोठे व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. तेथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. पालिका व्यापारी संकुलासमोर पार्कींगला जागा आहे. मात्र त्या संकुलातील व्यापारी व त्यांचे ग्राहक तेथे वाहने न लावता रस्त्यावरच वाहने उभी करतात. तीच परिस्थिती रघुवंशी कॉम्प्लेक्स, भतवाल कॉम्प्लेक्स, समोरील राजीव गांधी कॉम्प्लेक्स या ठिकाणी पार्कींगची जागाच नाही. या कॉम्प्लेक्समधील दुकानदारांसमवेत ग्राहकांचे वाहने रस्त्यावर लावलेली असतात. त्यामुळे या कॉम्प्लेक्समध्ये जाण्या-येण्यासाटीही तारेवरची कसरत करावी लागते.या ठिकाणी महत्वाचे प्रतिष्ठाने आहेत. बॅंका, कार्यालये आहेत. मात्र दुचाकीचा विळखा या रस्त्यावर कायमचीच डोकेदुखी ठरली आहे.रस्त्याचा दोन्ही बाजूला दुचाकीची रिग असते. त्यामुळे मध्ये रस्ता अत्यंत तोकडा होतो. अशावेळी दोन कार पास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अशा बेशिस्त वाहतुकीला व बेशिस्त वाहन लावणाऱ्यांना पोलिसांनी वाहतुकीचा नियमांचा झटका दाखविणे आवश्‍यक आहे. तरच या परिसरातील बेशिस्त पार्कींगला शिस्त लागू शकते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news hart of city nandurbar vehical parking Drop it problem