टॉयलेटमध्ये स्वतःच केली प्रसुती...बाळाला बादलीत सोडून रूममध्ये येवून झोपली 

भूषण अहिरे
रविवार, 1 मार्च 2020

वसतीगृहात एफवायबीएमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अठरा वर्षीय मुलीने वसतीगृहाच्या टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. जन्म देऊन मुलीने बाळ तिथेच बादलीमध्ये सोडून दिले व भीतीपोटी पुन्हा मुलींमध्ये येऊन झोपी गेली.

धुळे : साक्री शहरातील सावित्रीबाई मुलींचे शासकीय आदिवासी निवासी वसतीगृहात द्वितीय वर्ष कला शाखेची अठरा वर्षीय विद्यार्थीनीला प्रसुतीच्या कळा आल्या. शेजारी झोपलेल्या मैत्रीणींना न सांगता गुपचूप टॉयलेटमध्ये जावून स्वतःच प्रसुती करून घेतली. जन्म दिलेल्या बाळाला तिथेच बादलीमध्ये टाकून पुन्हा रूममध्ये आली आणि झोपून राहिल्याचा प्रकार आज उघडकीस आला. 

क्‍लिक करा -तुझ्याशी लग्न करतो सांगत अत्याचार...अल्पवयीन मुलगी गर्भवती 

साक्री शहरात आदीवासी मुलींसाठी सावित्रीबाई मुलींचे शासकिय वसतीगृह आहे. या वसतीगृहात सदरचा प्रकार घडला असून, बाळाला जन्म देणारी ती युवती आणि बाळ यांना शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतका मोठा प्रकार घडेपर्यंत वसतीगृहातील अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीची माहिती मिळत नसल्याने वसतीगृहाचा अनागोंदी प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. 

बाळाच्या रडण्याचा आला आवाज 
वसतीगृहात एफवायबीएमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका अठरा वर्षीय मुलीने वसतीगृहाच्या टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. जन्म देऊन मुलीने बाळ तिथेच बादलीमध्ये सोडून दिले व भीतीपोटी पुन्हा मुलींमध्ये येऊन झोपी गेली. मात्र बाळाच्या रडण्याचा आवाजाने वसतीगृहाच्या वार्डन यांनी बाळाच्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता बादलीत बाळ पालथे पडलेले आढळून आले. याबाबत विचारणा केली असता कुणीही समोर यायला तयार नव्हते. पोलिसांनी तपासादरम्यान एका संशयित मुलीला आरोग्य तपासणीसाठी नेले असता हे बाळा तिचे असल्याचे निष्पन्न झाले. 

दोन महिन्यांपुर्वीच्या तपासणीत रिपोर्ट नील 
वसतिगृहातील विद्यार्थीने कुणालाही न कळू देता गुपचूप दिला टॉयलेटमध्ये बाळाला जन्म दिल्याचा प्रकार घडला. परंतु सदर युवतीची यापुर्वी दोन महिन्यांपूर्वीच साक्री शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत शासकीय रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी मुलीचा रिपोर्ट नील असल्याचे दाखवले होते. त्यानंतर दोन महिन्यांनंतर मुलीने एका बालकाला जन्म दिला. यातून शासकीय रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. 

वसतीगृह प्रशासन देखील अडचणीत 
या प्रकरणात निवासी वसतीगृहातील वरिष्ठांवर देखील संशय बळावला असून याबाबतची कमालीची गुप्तता वसतीगृह प्रशासनाकडून पाळली जात आहे. सध्या बाळ व बाळंतीण दोघांनाही पुढील उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साक्री पोलीस ठाण्यात याबद्दल नोंद करण्यात आली असून पुढील तपास साक्री पोलीस करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathu news dhule aadivashi hostel girl dilevary birth child toilet and sleep room