हतनूरमध्ये २९ टक्के जास्त जलसाठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणात यंदा पाणी पातळी चांगली आहे. आतापर्यंत केवळ तीनच आवर्तन सोडण्यात आली असून, उन्हाळ्यात कपाशी लागवडीसाठी मागणी झाल्यास पाटाने पाणी सोडले जाईल. अद्याप पाण्याची मागणी नसल्याने धरणातील जलपातळी जुलै पर्यंत टिकून राहिल. 
- एन. पी. महाजन, कार्यकारी अभियंता, हतनूर.

भुसावळ : भुसावळ रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, भुसावळ, यावल, सावदा मोठ्या नगरपालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा करणारे हतनूर धरण यंदा फुल्ल झाले आहे. गतवर्षाच्या तुलनेत धरणात यंदा २९ टक्के अधिक जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याची सुखद परिस्थिती आहे. 

क्‍लिक करा - सापडलेल्या एक लाख रूपयांच्या बॅगसोबतचा प्रवास...पांडूरंगाच्या दर्शनापेक्षाही दिले याला प्राधान्य 

जिल्ह्यासाठी जिवनदायी असलेल्या हतनूर धरण क्षेत्रात यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. धरणात गतवर्षी पेक्षा अधिक २९ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी १२५ गावे आणि ५ शहरे टंचाईमुक्त होणार आहे. गेल्या वर्षी हतनूर धरणात मार्च महिन्यात ४२ टक्के जलसाठा होता. यंदा मात्र वरुण राजाच्या कृपेमुळे धरण ७० टक्के भरलेले आहे. २०१८ मध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने हतनूर धरणावर अवलंबून असलेली एकशे तीस गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. या तुलनेत २०१९ मध्ये हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरणात उशिरापर्यंत आवक सुरू होती. यामुळे धरण शंभर टक्के भरले होते. व डिसेंबर अखेरपर्यंत हतनूर धरणातून तापी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू असल्याने भुसावळ पालिका दीपनगर औष्णिक वीज केंद्र भुसावळ रेल्वे जळगाव एमायडिसी या तापी नदीच्या बंधाऱ्यात अद्यापही मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे तूर्तास धरणातून विसर्ग करण्याची गरज नाही. 

धरणातील पाणी पातळी 
हतनूर धरणात यंदा २१२.७३० मीटर पाणी पातळी आहे. तर १८१.५० दलघमी जिवंत पाणीसाठा असून, याचे प्रमाण ७१.१८ टक्के इतके आहे. तर गेल्या वर्षीची पाणी पातळी २११.०७५ मीटर होती, तर १०५. ७५ दलघमी जिवंत साठा होता. त्यांचे प्रमाण ४२ टक्के होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हेच प्रमाण २९ टक्के इतके आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news hatnur dam 29 percentage water lavel 132 village tanchai free