सापडलेल्या एक लाख रूपयांच्या बॅगसोबतचा प्रवास...पांडूरंगाच्या दर्शनापेक्षाही दिले याला प्राधान्य 

cash
cash

यावल​ : पांडूरंगाच्या दर्शनाची ओढ बऱ्याच दिवसांपासून होती. ती पुर्ण करण्याचा दिवस आला अन्‌ सुरू झाला प्रवास. रात्रीचा प्रवास संपून सकाळी उठल्यावर समोरच्या सीटवर एक बॅग सापडली. त्या बॅगेत हजार नव्हे, तर एक लाख रूपयांची कॅश. सापडलेल्या रक्‍कमेचे करायचे काय? मनात होता विचार. पण प्रामाणिकपणा दाखवून प्रवासादरम्यानच संबंधीताला संपर्क करून सांगितले. पंढरपूरला उतरल्यावर चंद्रभागेवर स्नान केले, पण पांडूरंगाचे दर्शन घेण्यापुर्वीच एक लाखाची बॅग परत करण्यात धन्यता मानली. 

दहिगाव (ता. यावल) येथील शिवबा गृपच्या युवा कार्यकर्त्यांना रेल्वेत एक लाख रुपयांची बॅग आढळली. ती मूळ मालकास प्रामाणिकपणे परत केल्याची घटना रविवारी (ता.8) घडली. शिवबा गृपचे राहुल महाराज, हेमंत पाटील, विक्की पाटील, कपील पाटील, निलेश मिस्त्री, योगेश पाटील, सोनू पाटील, गौरव पाटील यांनी रविवारी सायंकाळी सहाला भूसावळवरून पंढरपुरला जाण्यास निघाला. पांडुरंगाचे दर्शन घेण्याची खूप दिवसांपासूनची ईच्छा होती. जेवणाचे डबे घेवून त्यांनी रेल्वेने प्रवास सुरू केला. गाडीत अनेक गप्पा गोष्टीचे सत्र रंगले. मित्रांसोबत डबा पार्टीही झाली व रात्री सर्वजण झोपले. दुसऱ्या दिवशी गाडी कुर्डवाडी स्टेशनला थांबली. कार्यकर्त्यांच्या डब्यातून अनेक जण उतरले व चढलेही. परंतू याठिकाणी एक गोष्ट खूपच आश्‍चर्यकारक घडली. सर्व कार्यकर्ते ज्या सीटवर बसले होते, त्या सीटच्या समोरच सिंगल सीटवर एक गृहस्थ दोन स्टेशन अगोदरपासून बसले; ते कुर्डवाडी स्टेशनला उतरले. 

बॅग उघडून पाहिली 
प्रवाशी बॅग विसरुन गेले होते. सौदागर दिलीप खंडागळे (रा. जेऊळ) असे बॅग हरविलेल्या व्यक्‍तीचे नाव. हा प्रकार लक्षात येईपर्यंत कुर्डुवाडी स्टेशनवरून गाडी निघून गेली होती. बॅग तर अनोळखी इसमाची असल्याने उघडायची कशी? हा प्रश्न सगळ्यांना पडला. थोडे धाडस करून कार्यकर्त्यांनी बॅग उघडली. बघतो तर काय....! त्या बॅगमध्ये नोटांचे एक बंडल होते. एवढा पैसा बघून भिती वाटली. परंतु, हा जो पैसा आहे तो त्या व्यक्तिला द्यायचाच, हा ठाम निश्‍चय केला. 

मग झाली शोधाशोध सुरु 
बॅगमध्ये व्यक्तीचा काही पत्ता सापडतो का? याची सुरवातीला तपासणी केली. इतकी मोठी रक्‍कम पाहून शब्दच सुचत नव्हते. परंतु मनात एकच होते की बॅग ज्याची आहे त्याला ती मिळालीच पाहिजे. बॅगची तपासणी केली असता एका कार्डावर संपर्क क्रमांक आढळून आला. त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता एक- दोन वेळेस ट्राय करुनही फोन लागत नव्हता. बऱ्याच प्रयत्नानंतर फोन लागला. आमच्यातला एक जण त्या व्यक्तीला बोलू लागला 

आवाज ऐकताच हुंदके आवरेना 
फोन लोगल्यानंतर समोरुन आवाजही घाबरल्यासारखा येत होता. कोण पाहीजे? म्हणून विचारणा केली. मी ट्रेन मधून बोलतोय राहुल महाराज, आम्हाला तुमची बॅग ट्रेनमध्ये सापडली. असं बोलल्याबरोबर समोरचा व्यक्ती हुंदके देवून रडू लागला. "दादा रडू नका, म्हणून सांगत आम्ही पंढरपुरास उतरतो आहे. तुम्ही या पंढरपूर स्टेशनला म्हणून सांगितले. असं बोलून फोन ठेवला. आम्ही पंढपुरास पोहचलो. स्टेशनवर उतरल्यावर चंद्रभागेचे स्नान केले. इतक्‍यात संबंधीत व्यक्‍तीचा फोन आला. लगेच पंढरपुर स्टेशन गाठले, पांडुरंगाचे दर्शन बाकी होते. परंतू मनात विचार आला की याला बॅग दिल्याशिवाय तो पांडुरंगही खूष होणार नाही. रेल्वे स्टेशनला येवून बॅग परत करत दादा बॅगेत खूप पैसे आहे. एकदा तपासून घ्या. तो नाही म्हणत होता तरीही विनंती करत पैसे मोजायला लावले. पैसे मोजून झाल्यावर तो म्हणू लागला सगळे बरोबर आहे.. एक लाख रुपये. हे ऐकल्यावर थक्‍क झाले. पण हरविलेले पैसे परत मिळाल्याचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पांडुरंगाचे दर्शन घडवत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com