खानदेशात बाधितांचा आकडा शंभरी पार; मृतांची संख्या 20 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून खानदेशातील बाधितांची संख्या वाढू लागली. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धुळे जिल्ह्यात मालेगाव कनेक्‍शन असलेल्या रुग्णांमुळे ही संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून आले.

जळगाव : संपूर्ण राज्याप्रमाणे गेल्या पंधरवड्यापासून खानदेशातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच राहिली. परिणामी आज सायंकाळपर्यंत बाधितांच्या संख्येने शंभरी पार करीत 105 चा आकडा गाठला आहे. यात बाधितांपैकी 20 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

आवर्जून वाचा - प्रशासनाच्या झोपेमुळे जळगाव बनले "हॉटस्पॉट' 
 

विशेष म्हणजे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून खानदेशातील बाधितांची संख्या वाढू लागली. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धुळे जिल्ह्यात मालेगाव कनेक्‍शन असलेल्या रुग्णांमुळे ही संख्या झपाट्याने वाढल्याचे दिसून आले. आज सायंकाळपर्यंत जळगाव जिल्ह्यात 52, धुळे जिल्ह्यात 32, तर नंदुरबार जिल्ह्यात 18 बाधित रुग्णांची नोंद झाली असून, जळगाव जिल्ह्यात 13, धुळ्यात 6 आणि नंदुरबारमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. 

जळगावात सात नवे बाधित 
जळगाव येथील कोविड रुग्णालयात "स्वॅब' नमुने घेतलेल्या 76 संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. यांपैकी 68 व्यक्तींचे तपासणी अहवाल "निगेटिव्ह' आले, तर एकाचा अहवाल "रिजेक्‍ट' करण्यात आला. अन्य सात व्यक्तींचे तपासणी अहवाल "पॉझिटिव्ह' आले आहेत. आत "पॉझिटिव्ह' आलेल्या सात व्यक्तींमध्ये 40 वर्षीय पुरुष हा जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथील रहिवासी आहे; तर 65 वर्षीय पुरुष हा अडावद (ता. चोपडा) येथील रहिवासी आहे. अन्य दोन व्यक्तींमध्ये 24 वर्षीय महिला व 30 वर्षीय पुरुष हे पाचोरा येथील आणि अमळनेर येथील तीन व्यक्तींमध्ये 13 व 23 वर्षांचे तरुण व 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे. यापैकी जळगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

जळगावची पन्नाशी पार 
जिल्ह्यात "कोरोना'बाधितांचा आकडा थांबायला तयार नाही. एकवेळ जळगाव "ग्रीन झोन'मध्ये जाण्याची शक्‍यता वाटत असताना "व्हायरस'चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे अवघ्या दहा- बारा दिवसांत जळगाव जिल्ह्याने "कोरोना'ग्रस्त रुग्णांच्या संख्येत पन्नाशी पार केली आहे. आतापर्यंत "कोरोना'बाधित रुग्णांची संख्या 52 झाली आहे. पैकी तेरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news hundred corona case complete khanadesh aria