योग दिन : वयाचा सत्तरीतही ते देताहेत योगाभ्यासाचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

पन्नासचावर योग शिबिरे घेऊन हजारो नागरिकांना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन योगाचा प्रचार व प्रसार करणारे तळोदा शहरातील प्रा. आर. ओ. मगरे हे आजही योगाचे महत्व पटवून देण्यासाठी धडपडत असतात.

तळोदा : प्राचीन काळापासून मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. वयाचा सत्तरीत देखील नियमितपणे योग, प्राणायाम करत इतरांनाही योगाचे धडे ते देत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी जवळपास पन्नासचावर योग शिबिरे घेऊन हजारो नागरिकांना, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन योगाचा प्रचार व प्रसार करणारे तळोदा शहरातील प्रा. आर. ओ. मगरे हे आजही योगाचे महत्व पटवून देण्यासाठी धडपडत असतात. जागतिक योग दिनाचा पूर्व संध्येला त्यांचाशी साधलेला संवादातून त्यांनी मानवी जीवनात योग, प्राणायामचे महत्व प्रश्नोत्तराच्या स्वरुपात अधोरेखित केले आहे. 

प्रश्न :- योगाची आवड कशी व कधीपासून लागली? 
उत्तर :- लहानपणापासून सकाळी लवकर उठून जॉगिंग, व्यायाम करण्याची सवय होती, मात्र योग प्रकाराशी तसा लांबच होतो. परंतु २००६ मध्ये भारत स्वाभिमान ट्रस्टचे काम पाहणे सुरु केले व हळूहळू योगासन, प्राणायाम करायला सुरुवात केली. योगामुळे मला खूप चांगले अनुभव आलेत व स्वतःला खूप फायदा झाला. गेल्या १४ वर्षांपासून योग हा माझा जीवनाचा अविभाज्य असा घटक बनला आहे. 

प्रश्न :- योगाबद्दल काय सांगणार? 
उत्तर :- योग फक्त व्यायाम नसून स्वतःमध्ये व निसर्गात एकत्व शोधण्याचा भाव आहे. योगामुळे जीवनशैलीत योग्य असे परिवर्तन होते व निसर्गातील बदलाचे परिणाम सहन करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असते. 

प्रश्न :- मानवी जीवनात योगाचे महत्व कोणते? 
उत्तर :- योगामुळे व्यक्तिमत्त्व विकासात भर पडते, योगामुळे मानवाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते. योगामुळे दिवसभर उत्साह टिकून राहतो व सर्वात महत्त्वाचे आपले मन, शरीर आनंदी व तणावमुक्त राहते. नियमित योग केल्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते. 

प्रश्न :- सध्या कोरोनाचा काळात, काय करण्याचा सल्ला देणार? 
उत्तर :- कपालभाति, अनुलोम - विलोम हे दोन प्राणायामाचे प्रकार प्रत्येकाने करावेत. हे प्रकार केल्याने आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो. त्याचबरोबर शरीरातील अतिसूक्ष्म पेशींना देखील प्राणवायूचा पुरवठा होऊन पेशी अधिक कार्यक्षम बनतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि कोरोनाचा काळात हे सर्वांसाठी फारच उपयुक्त ठरु शकते. 

प्रश्न :- आपण योगाचा प्रचार कोठे व कसा केला आहे? 
उत्तर :- मी शहरातील ठिकठिकाणी भारत स्वाभिमान ट्रस्ट व योग दिनानिमित्त आयोजित शिबिरांचा माध्यमातून योगाचा प्रचार व प्रसार केला आहे. तालुक्यातील मोड, बोरद, खरवड, तळवे आणि जिल्ह्यातील अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार, शहादा याठिकाणी ३ ते ५ दिवशीय शिबिराचे आयोजन करुन योग, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांना योग व प्राणायाम बाबतचे महत्व पटवून दिले आहे. 

प्रश्न :- योग शिबिरात आपल्याला कोणाकोणाची साथ लाभली आहे? 
उत्तर :- आत्तापर्यंत मी जवळपास ५० चा आसपास शिबिरांमध्ये नागरिकांना व विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले आहे. याकामी मला प्रा. एन. डी. माळी, गेनमल कोचर, स्वर्गीय प्रा. एम. एस. पाटील, पुष्पा गोसावी, नवनीत शिंदे, परमार, किरण पाटील यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news international yog day taloda 60 year man yoga training