"कोरोना'चा फटका... कर्जमुक्ती योजनेपासून 33 हजार शेतकरी वंचित 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

कोरोनामध्ये फक्त महत्त्वाच्या कामांना शासकीय पातळीवर प्राधान्य दिले जात आहे. यामुळे कर्जमुक्ती योजना सध्या दुर्लक्षित आहे. खरीप हंगाम तोंडावर उभा आहे.
 

जळगाव ः राज्यात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरू करून दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्यांना लाभ देवू केला होता. अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभही मिळाला. मात्र, जळगाव जिल्ह्यात अद्यापही 33 हजारांवर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ न मिळाल्याने ते योजनेपासून वंचित आहेत. "कोरोना'च्या संसर्गामुळे सर्वत्र "लॉकडाउन' आहे. मंत्रालयात व विविध शासकीय कार्यालयात केवळ पाच टक्केच कर्मचारी कामावर आहेत. यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती रखडली असल्याचे सांगितले जात आहे. 

क्‍लिक कराः"कोरोना'जनजागृतीसाठी आता राज्यात "स्वच्छताग्रही': गुलाबराव...
 

कर्जमुक्ती योजनेत लाभास पात्र शेतकऱ्यांची माहिती जानेवारी महिन्यात युद्ध पातळीवर घेऊन शासनाच्या कर्जमुक्तीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचे अकाउंट क्रमांक, आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी ठिकठिकाणी प्रमाणीकरणाचे कॅम्प लावले गेले. त्यानंतर कर्ज मान्य असल्याबाबत "थम्ब' घेऊन तो कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येत होते. जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बॅंकेच्या 1 लाख 27 हजार 832 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष या योजनेचा लाभ मिळाला. त्यासाठी शासनाकडून 593 कोटींचा निधी आला होता. त्यापैकी 587 कोटींचा निधी वाटप झाला. बॅंकेचे 37 हजार 321 लाभार्थ्यांना लाभ देणे बाकी आहे; तर 23 हजार 433 शेतकऱ्यांची अजून नावे येणे बाकी आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांचे सुमारे दहा हजार शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. असे एकूण सुमारे 33 हजार शेतकऱ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. 

आर्वजून पहा : शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करा : पालकमंत्री सत्तार
 

कोरोनामध्ये फक्त महत्त्वाच्या कामांना शासकीय पातळीवर प्राधान्य दिले जात आहे. यामुळे कर्जमुक्ती योजना सध्या दुर्लक्षित आहे. खरीप हंगाम तोंडावर उभा आहे. शेतकऱ्यांना अद्याप खरीप कर्ज वाटपाचे नियोजन जिल्हा प्रशासनाने, कृषी विभागाने, बॅंकांनी जाहीर केलेले नाही. या योजनेचा लाभ जर मेपूर्वीच मिळाला, तर अनेक शेतकऱ्यांना बियाणे, खते घेण्यास मदत होऊ शकेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

दृष्टिक्षेपात 

 जेडीसीसी बॅंकेचे अपलोड खाते ः 1 लाख 51 हजार 265 
 विशिष्ट क्रमांक घेऊन प्राप्त यादी ः 1 लाख 27 हजार 832 
 निधी प्राप्त सभासद ः 1 लाख 13 हजार 944 
 निधीची रक्कम ः 593 कोटी 80 लाख 
 निधी वाटप झालेले सभासद ः 1 लाख 12 हजार 962 
 निधीची रक्कम ः 587 कोटी 73 लाख 
 विशिष्ट क्रमांक मिळणे बाकी शेतकरी ः 23 हजार 433 
 रक्कम येऊन निधी वाटप बाकी शेतकरी ः 37 हजार 321 

नक्की वाचा : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले फेसशिल्ड!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon 33,000 farmers deprived of debt relief scheme