शहरातील महामार्ग पाळधीपर्यंत होणार चौपदरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जळगाव : शहरातील महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी जानेवारीअखेरपर्यंत निविदा मागविण्यात आल्यानंतर आता खोटेनगर ते थेट पाळधीपर्यंतच्या चौपदरीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर सहा महिन्यांपासून ठप्प फागणे ते तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. 

जळगाव : शहरातील महामार्गाच्या खोटेनगर ते कालिंकामाता टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी जानेवारीअखेरपर्यंत निविदा मागविण्यात आल्यानंतर आता खोटेनगर ते थेट पाळधीपर्यंतच्या चौपदरीकरणासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर सहा महिन्यांपासून ठप्प फागणे ते तरसोद टप्प्यातील चौपदरीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचा दावा केला जात आहे. 
जळगाव शहरासाठी जिव्हाळ्याच्या बनलेल्या महामार्ग चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांचा विषय अनेक आंदोलने व पाठपुराव्यानंतर गेल्या महिन्यात मार्गी लागला. या दोन्ही कामांपैकी खोटेनगर ते कालिंकामाता चौकापर्यंत चौपदरीकरणासाठी निविदा मागविण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) मान्यता दिली व व जानेवारीअखेरपर्यंत त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त निविदा 1 फेब्रुवारीस उघडण्यात येतील. 

पाळधीपर्यंत चौपदरीकरण 
दरम्यान, खोटेनगरच्या पुढे थेट बांभोरी व पाळधीपर्यंत विद्यापीठ, जैन इरिगेशन, अभियांत्रिकी व अन्य महाविद्यालयांची व्याप्ती असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे खोटेनगरपासून थेट बांभोरी व पुढे पाळधी बायपासपर्यंत चौपदरीकरणाचे काम करण्याची मागणीही होऊ लागली आहे. त्यामुळे धुळे ते जळगाव व पुढे थेट मुक्ताईनगरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण होत असताना खोटेनगर ते पाळधी हा टप्पाही त्यात असावा, या हेतूने या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 
 
"फागणे-तरसोद'चे काम मार्गी 
सुरवातीला गेल्यावर्षी वेगाने सुरू झालेले फागणे-तरसोद या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सहा महिन्यांपासून ठप्प आहे. या टप्प्यात बहुतांश ठिकाणी सपाटीकरणाचे काम झाले आहे, मात्र त्यानंतर हे काम बंद पडले. मक्तेदार कंपनीस निधी उपलब्ध न झाल्याने काम ठप्प झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मक्तेदार कंपनीचे आर्थिक अडचण दूर झाली असून, नव्याने काम सुरु करण्याचे नियोजन "न्हाई'ने मंजूर केले आहे. येत्या पंधरा दिवसांत हे कामही सुरू होण्याचे सांगितले जात आहे. 
 
बैठकीत प्रस्तावावर चर्चा 
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज "न्हाई'चे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत रस्ते विकासाबाबत बैठक घेत कामांचा आढावा घेतला. त्यात पाळधीपर्यंतच्या चौपदरीकरणाचा विषयही झाला. त्यासंबंधी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना "न्हाई'ला देण्यात आल्या आहेत. 

Web Title: marathi news jalgaon 4 way road paldhi jalgaon city