"आदर्श' शिक्षकांकडून प्रमाणपत्रे घेतली परत 

"आदर्श' शिक्षकांकडून प्रमाणपत्रे घेतली परत 

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नाव जाहीर करण्यापासून सुरू असलेला घोळ पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर देखील थांबलेला नाही. शिक्षकदिनाचा मुहूर्त चुकवून घेतलेल्या कार्यक्रमातही सीईओंची स्वाक्षरी नसलेले आदर्श शिक्षक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सही नसल्याने हे प्रमाणपत्र सोहळ्यानंतर शिक्षकांकडून परत घेण्याचे काम शिक्षण विभागाकडून करण्यात आले. या सर्व प्रकारातून आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यातील घोळ चव्हाट्यावर आला. 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिले जाणारे आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुरस्कारासाठी शिक्षकाची निवड करण्यापासून तर यादी जाहीर करण्यापर्यंत घोळ झाले आहेत. शिक्षक दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येत असून, शिक्षण विभागाने मुहूर्त चुकविल्यानंतर देखील शिक्षकांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह घरी नेता आले नाही. शिक्षण दिनी नियोजित केलेला कार्यक्रम रद्द झाल्यानंतर दहा दिवसांनी कार्यक्रमाचे आयोजन झाले. तरी देखील शिक्षण विभागाची पूर्ण तयारी नसल्याचे आजच्या प्रकारावरून पाहण्यास मिळाले. प्रमाणपत्र देऊन शिक्षकांना सन्मानित केल्यानंतर ते पुन्हा परत घेण्याचा लाजीरवाणा प्रकार आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाहण्यास मिळाला. 

सीईओंची सही नसलेले प्रमाणपत्र 
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबर घेण्यात येणार होता. परंतु, तो कार्यक्रम रद्द झाल्यानंतर दहा दिवसांनी कार्यक्रम घेण्यात आला. तरी देखील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारात देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांची स्वाक्षरी नव्हती. सीईओंची स्वाक्षरी नसल्याने शिक्षकांना देण्यात आलेले प्रमाणपत्र कार्यक्रम संपल्यानंतर परत घेण्यात आले. शिक्षण दिनी आयोजित कार्यक्रम दहा दिवस उशिराने झाल्यानंतर देखील शिक्षण विभागाकडून प्रमाणपत्रांवर सीईओंची स्वाक्षरी घेण्यात आली नाही. 

दीड तास उशिराने कार्यक्रम 
हा कार्यक्रम लेवाभवन येथे दुपारी दोनला आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार या अपेक्षेने शिक्षक व त्यांचा परिवार तसेच स्वागतगीत म्हणणाऱ्या विद्यार्थिनी सभागृहात येऊन बसले होते. परंतु, ठरलेल्या वेळेनुसार सभागृहात पदाधिकारी व अधिकारी देखील आलेले नव्हते. यामुळे कार्यक्रम नियोजित वेळेच्या दीड तास उशिराने उशिराने सुरू झाला. 

..तरीही मंत्र्यांची अनुपस्थिती 
शिक्षण विभागाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 5 सप्टेंबरला आयोजित केला होता. परंतु, पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन यांना वेळ नसल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. त्यांच्या वेळेनुसार कार्यक्रमाची तारीख ठरविण्याचे निश्‍चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज झालेल्या कार्यक्रमाला आमंत्रण पत्रिकेत नाव असलेल्यांपैकी खासदार रक्षा खडसे व खासदार उन्मेष पाटील यांचीच उपस्थिती होती. ज्यांच्यासाठी कार्यक्रम लांबविण्यात आला ते पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच एकही आमदार उपस्थित नव्हते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com