Loksabha 2019 : अनामत म्हणून भरली चक्क 25 हजारांची चिल्लर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

जळगाव : मकरंद अनासपुरेंच्या "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटाची झलक जळगावात पाहायला मिळाली. जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना अमानत रक्कम म्हणून उमेदवार संत बाबामहाहंसजी महाराज यांनी चक्क 25 हजार रुपयांची चिल्लर भरली. चिल्लर मोजताना उमेदवारासह कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. 

जळगाव : मकरंद अनासपुरेंच्या "गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटाची झलक जळगावात पाहायला मिळाली. जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करताना अमानत रक्कम म्हणून उमेदवार संत बाबामहाहंसजी महाराज यांनी चक्क 25 हजार रुपयांची चिल्लर भरली. चिल्लर मोजताना उमेदवारासह कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. 
सध्या संपूर्ण देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. चर्चेत राहण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवीत असतात. असाच प्रकार जळगाव लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. हिंदुस्तान निर्माण दल या पक्षाकडून संत बाबामहाहंसजी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला भरवी लागणारी अमानत रक्कम म्हणून उमेवाराने चक्क 25 हजार रुपयांची चिल्लर भरली. उमेदवाराने गोणी भरून चिल्लर आणल्यामुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. 

मतदारांनी गोळा केली चिल्लर 
हिंदुस्तान निर्माण दल पक्षाचे उमेदवार संत बाबामहाहंसजी यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना शक्‍य असेल तेवढी रक्कम दिली. अशी प्रत्येक तालुक्‍यातून गोळा झालेली ही चिल्लर उमेदवाराने अमानत रक्कम म्हणून आपल्या उमेदवारी अर्जासोबत निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली. 
 
मोजण्यासाठी लागले दोन तास 
निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेले उमेदवार संत बाबामहाहंसजी हे आज दुपारी एकच्या सुमारास अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी सोबत आणलेली 25 हजारांची अमानत रक्कम निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची चिल्लर मोजताना चांगलीच दमछाक झाली. चिल्लर मोजण्यासाठी तब्बल 7 ते 8 कर्मचाऱ्यांच्या पथकाला सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला. त्यानंतर संबंधित उमेदवाराला निवडणूक विभागातर्फे पोच देण्यात आली. 

Web Title: marathi news jalgaon advance cash 25 thaousand