भीक मागण्यासाठी शाळकरी मुलाचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

जळगाव : रामेश्‍वर कॉलनीतील बारा वर्षीय मुलगा संतोष नामदेव मराठे याचे भिक्षा मागण्यासाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र, यापूर्वी त्या मुलाला परत आणून सोडल्याने पोलिसांत तक्रार होऊ शकली नाही. तद्‌नंतर मात्र 23 जानेवारीपासून मुलगा बेपत्ता असल्याने गुन्हा दाखल होऊन बापू शंकर शिंपी उर्फ (जॉनी) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

जळगाव : रामेश्‍वर कॉलनीतील बारा वर्षीय मुलगा संतोष नामदेव मराठे याचे भिक्षा मागण्यासाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र, यापूर्वी त्या मुलाला परत आणून सोडल्याने पोलिसांत तक्रार होऊ शकली नाही. तद्‌नंतर मात्र 23 जानेवारीपासून मुलगा बेपत्ता असल्याने गुन्हा दाखल होऊन बापू शंकर शिंपी उर्फ (जॉनी) याला पोलिसांनी अटक केली आहे. 
शहरातील तुळजामाता नगर रामेश्‍वर कॉलनीतील रहिवासी संतोष नामदेव मराठे (वय-12) याला जानेवारी महिन्याच्या सुरवातीला बापू शंकर शिंपी ऊर्फ जॉनी (वय 60) हा भिकारी सोबत घेऊन गेला होता. काही दिवस संतोष मराठे त्याच्या सोबत राहिल्यावर कुटुंबीयांना माहिती मिळताच संतोषला घरी आणून या बाबाला मुलाच्या कुटुंबीयांनी व परिसरातील रहिवाशांनी दम दिला होता. या घटनेला आठ ते दहा दिवस उलटत नाही, तोवर 23 जानेवारीस संतोष मराठे हा पुन्हा बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही तो सापडला नाही. अखेर मुलाची आई सुनीता नामदेव पाटील (वय-35) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत दोन दिवसांनी (ता. 25) अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, सचिन चौधरी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाने शोध घेत जॉनी उर्फ बापू शंकर शिंपी याला अटक केली. अटकेनंतर त्याला जिल्हा न्यायालयात न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे ऍड. जी. एम. बारगजे यांनी कामकाज पाहिले. 

शाळकरी विद्यार्थी 
संतोषच्या कुटुंबात आई-वडील, लहान बहीण असा परिवार असून, मेहरुणच्या जय दुर्गा विद्यालयात तो सातवीचे शिक्षण घेत आहे. मोलमजुरी करणाऱ्या परिवारातील असल्याने हलाखीची परिस्थिती असल्याची माहिती असल्याने या भामट्या बापूने त्याला आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती परिसरातील रहिवाशांनी दिली. 

दारूसाठी ओढले जाळ्यात 
बापू शंकर शिंपी (वय 60, पूर्वी रा. कांचननगर) हा सिंधी कॉलनी परिसरातच फुटपाथवर पडलेला असतो. त्याला दारूचे व्यसन असून, त्याच्यासोबत नेहमीच लहान मुले असतात. या मुलांना भिक्षा मागायला लावून त्याच्या पैशांवर दारूची नशा भागवत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी देखील बेपत्ता संतोष मराठे हा मुलगा या बाबासोबत भटकंती करताना परिसरातील नागरिकांनी पाहिले असून, त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक संदीप हजारे तपास करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon alms child kidnaping old man arrest