अनेरचे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

चोपडा : तालुक्‍यातील सतरा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेर धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज गलंगी (ता. चोपडा) येथे शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. एक मेपर्यंत पाणी सोडण्यात येईल, असे आश्‍वासन अभियंत्यांनी दिल्याने रास्तारोको मागे घेण्यात आला. 

चोपडा : तालुक्‍यातील सतरा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेर धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज गलंगी (ता. चोपडा) येथे शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. एक मेपर्यंत पाणी सोडण्यात येईल, असे आश्‍वासन अभियंत्यांनी दिल्याने रास्तारोको मागे घेण्यात आला. 
गलंगी, वेळोदे, घोडगाव, विटनेर, वढोदा, अनवर्दे, कुसुंबा, गणपूर, बुधगाव आदींसह अनेर काठावरील सतरा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने कूपनलिका आटल्या आहेत. येते दोन महिने ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. मात्र, पाणीटंचाईने अडचणी येणार आहेत. रास्तारोको प्रसंगी शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाच्या विरोधात विविध घोषणाबाजी केली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पेंढारकर, अनेर धरणाचे शाखा अभियंता पी. बी. पाटील, उपअभियंता व्ही. एस. पाटील यांची चर्चा झाली. परिसरातील आठ ते दहा ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन रीतसर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. एक मेपर्यंत पाणी अनेर धरणातून अनेर नदीत सोडण्यात येईल, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्याने रास्तारोको मागे घेण्यात आला. यावेळी प्रकाश रजाळे, प्रदीप पाटील, प्रमोद पाटील, माधवराव पाटील, विजय पाटील, कुलदीप सिसोदिया, शिवाजी राजपूत, अंबालाल राजपूत, नितीन पाटील, सुभाष नेरपगारे, प्रकाश पाटील, घनश्‍याम पाटील, तन्वीर राजपूत, मनोहर पाटील, शिवाजी पाटील, मणीलाल पाटील, जितेंद्र पाटील, डोंगर पाटील, बाळू पाटील, विजय पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक भीमराव नांदूरकर, संदीप धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला. 
 
जलसंपदामंत्र्याची भेट 
कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील, चोपडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शशिकांत देवरे, नितीन पाटील, गुलाब पाटील यांनी भाजपचे नेते घनश्‍याम अग्रवाल व पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हाळके यांची भेट घेतली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना अनेर धरणातून आवर्तन सोडण्याबाबत मागणी केली आहे. मंत्री महाजन यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Web Title: marathi news jalgaon aner dam rastaroko