...आतातरी औरंगाबाद महामार्गाचे भाग्य उजळेल? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाचे काम विशेष बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दोन वर्षांपूर्वी मंजूर करत त्यासाठी सुमारे 900 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. निविदा प्रक्रिया होऊन संबंधीत मक्तेदारास कार्यादेशही देण्यात आले.

जळगाव : "औरंगाबाद-जळगाव महामार्गाने यायचे तर डॉक्‍टर सोबत घेऊनच यावे लागेल; अन्यथा प्रवासानंतर अंग चेपण्याची व्यवस्था करावी लागेल.' सर्वसामान्य प्रवाशाचे नव्हे, तर राजकारणातील साहेब अर्थात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांचे हे वक्तव्य. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या व नरकयातनांचा अनुभव येणाऱ्या औरंगाबाद महामार्गाबाबत पवारांच्या या महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराचे धिंडवडे काढणाऱ्या विधानानंतर तरी या मार्गाचे भाग्य उजळेल का? हा प्रश्‍न आहे. 

 हेपण वाचा - रेल्वेने मंगळवारी मुंबई, सुरतला जाताय...अगोदर हे पहा 

औरंगाबाद-जळगाव महामार्ग चौपदरीकरणाचे काम विशेष बाब म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दोन वर्षांपूर्वी मंजूर करत त्यासाठी सुमारे 900 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. निविदा प्रक्रिया होऊन संबंधीत मक्तेदारास कार्यादेशही देण्यात आले. जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या अजिंठा लेण्या याच मार्गावर असल्याने हे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, औरंगाबादपासून कामाची सुरवात होऊन मक्तेदाराने फर्दापूर-पहूरपर्यंत दोन्ही बाजूंनी हा महामार्ग खोदून ठेवला. सोबतच माती, मुरुमही टाकला. मात्र, नंतर दीड वर्षापासून जे काम ठप्प झाले ते आजपर्यंत सुरू होऊ शकलेले नाही. 

नक्‍की पहा - उचलून घरात नेले..तिच्यासोबत खेळलीही...नंतर बुडविले पाण्याच्या टाकीत 

मक्तेदाराचे पलायन 
"दुष्काळात तेरावा महिना' म्हणून हे काम मिळालेल्या मक्तेदार एजन्सीची आर्थिक स्थिती बिघडली आणि मक्तेदार काम सोडून गेला. मात्र, तोपर्यंत मूळ रस्त्याची जी वाट लागायची ती लागून गेली. दोन्ही बाजूंनी रस्ता खोदल्याने आधी अस्तित्वात असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली. दोन वर्षांत या मूळ रस्त्याची दुरुस्तीही झाली नाही. आतातर या संपूर्ण 150 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून चारचाकी काय, दुचाकीलाही जायची सोय राहिलेली नाही. 

माध्यमे, सोशल मीडियातून चर्चा 
रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत दीड वर्षापासून प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियातून चर्चा सुरू आहे. या रस्त्याच्या अवस्थेमुळे जळगाव-औरंगाबाद मार्गावरून जाणाऱ्या एस.टी. बस व खासगी वाहने आता चाळीसगावमार्गे जात आहेत. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्याबाबत सोशल मीडियावर खूप टीका झाली. त्याची दखल गडकरींनी घेतली आणि आठवडाभरात रस्ता वाहतुकीसाठी योग्य (मोटरेबल) करावा, असे आदेश दिले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे महामार्ग युनिट व "न्हाई'ने तात्पुरती रस्ता दुरुस्ती सुरू केली. मात्र, आता तेदेखील काम थंडबस्त्यात आहे. 

पवारांकडून दखल 
आतातर दस्तुरखुद्द पवारांनी या रस्त्याच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. पवारांच्या शब्दाला महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही मान आहे. त्यांनी टाकलेला शब्द शक्‍यतोवर कुणी टाळू शकत नाही. त्यामुळे या रस्त्याचे आतातरी भाग्य उजळावे, अशी आशा निर्माण झाली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon aurangabad highway damage sharad pawar