चार दिवसांच्या बाळाला रिक्षात सोडून मातेचे पलायन 

live photo
live photo

जळगाव : शहरातील अमनपार्क येथे अवघ्या चार दिवसांच्या बाळाला रिक्षात सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची घटना आज सायंकाळी आठला उघडकीस आली. मोकाट कुत्रे रिक्षात चढत असताना रिक्षाचालक बाहेर आला. मुलाच्या रडण्याचा आवाजाने सीट मागून बाळाला उचलत बाहेर काढले. या बाळाचे फोटो व्हॉटस्‌अपवर व्हायरल झाले अन जन्मदात्यांनी नाकारलेल्या या बाळाचे अवघ्या तीन तासातच नशीब पालटले. शहरातील डॉक्‍टर, शिक्षक, इस्टेट ब्रोकर्स यांच्यासह दुबईत स्थायिक झालेल्या एका दाम्पत्याने पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. 

शिवाजीनगर अमनपार्क येथील रिक्षाचालक हरून शेख गयासोद्दिन यांची ऑटोरिक्षा (एमएच 19, व्ही 7704) घराबाहेर उभी होती. पावसामुळे त्यांनी आज रिक्षाच काढली नसल्याने ते घरीच होते. रात्री सव्वाआठच्या सुमारास रिक्षाजवळ मोकाट कुत्र्यांनी गर्दी करून आत शिरत असताना बाळाचा रडण्याचा आवाज आला. डोकावून पाहिले असता मागील सीटला लागून असलेल्या मोकळ्या जागेत बाळ रडत असल्याचे आढळले. घाबरतच बाळाला बाहेर काढल्यावर कोणाचं तरी बाळ कोणी उचलून तर रिक्षात टाकले नाही म्हणून गल्लीत विचारणा केल्यावर अवघ्या काही मिनिटांत महिला-पुरुष तरुणांची गर्दी झाली. कोणाचं बाळ, कोणाचं बाळ म्हणून बाया बापड्या या बाळाला बघत होत्या. परिसरातील रहिवासी तथा कादरिया फाउंडेशनचे फारुख कादरी यांनी तत्काळ शहर पोलिसांना घटना कळविली. पोलिस येण्याची वाट न बघता त्याच रिक्षातून, इमरान सय्यद, शेफाली शमी खान आदींनी या बाळाला पोलिस ठाण्यात आणले. रितसर नोंद घेऊन या बाळाला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी वजनासह इतर तपासण्या केल्या असून, बाळ सुदृढ असून, चार दिवसांचे असल्याचा अंदाज आहे. सध्या जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या "एनआयसीयू'त या बाळाला ठेवण्यात आले आहे. 

आईवर होणार गुन्हा दाखल 
शहर पोलिस ठाण्यात बाळाला आणल्यानंतर कादरिया फाउंडेशनतर्फे फारुख कादरी यांच्या नावाने ठाणे अंमलदार उल्हास चऱ्हाटे यांनी नोंद घेतली असून, मुलाला जन्म देणाऱ्या आईसह त्याच्या पालकांचा शोध घेण्यात येऊन तपासाअंती आईविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अकरा बोटं अन्‌ गोरापान 
रिक्षात आढळून आलेल्या बाळाच्या उजव्या हाताला अकरा बोटे असून, लालबुंद चेहरा, गुलाबी ओठ, दोन्ही गालांवर उठावदार नाक, मोठे डोळे अशा सुंदर कांती लाभलेल्या या बाळाला त्याच्या आईने जरी नाकारले असले तरी, काहीच तासात अनेक आईंचे प्रेम त्याला शिवाजीनगरात मिळाले. बाळाला पाहण्यासाठी तरुणींसह महिलांनी गर्दी करत लेकराचे लाड केले. 

"व्हॉट्‌सऍप'ने पोहोचला दुबईत 
मुलाचे फोटो काढत तरुणांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल केले. बघता बघता या मुलाचे पालकत्व आपल्याला मिळावे, अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली. परिसरातील अलहिंद चॅरिटेबल हॉस्पिटलचे डॉ. अलीम शेख, प्रसिद्ध ईस्टेट ब्रोकर इम्रान शहा यांच्यासह दुबई स्थित व्यावसायिकांनी या मुलाचे पालक होण्याची तयारी दर्शवली असून, दुबईच्या खान दाम्पत्याचे नातेवाईक शफाकत खान थेट कार घेऊनच उस्मानिया पार्क येथे कादरिया फाउंडेशनच्या अध्यक्षांच्या घरी पोचले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com