विद्यापीठाचा नंदुरबार जिल्ह्यासाठी घेतला ऐतिहासिक निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ५(८) अन्वये विद्यापीठ संचालित (कंडेक्टेड) महाविद्यालय सुरु करण्याची तरतूद आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळू शकत नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठाने पोहचले पाहिजे असे अभिप्रेत आहे.

जळगाव : दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावी विद्यापीठ संचालित (कंडक्टेड) वरिष्ठ विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मोलगी येथे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

हेही वाचा - अपंग शिक्षक सकाळी गेले फिरायला...मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी थांबले अन्‌ 

विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ५(८) अन्वये विद्यापीठ संचालित (कंडेक्टेड) महाविद्यालय सुरु करण्याची तरतूद आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळू शकत नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत विद्यापीठाने पोहचले पाहिजे असे अभिप्रेत आहे. त्यादष्टीने कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी पुढाकार घेऊन हे महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

समितीद्वारे सर्वेक्षण 
व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपूर्वी समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य एल.पी. देशमुख, प्रा. मोहन पावरा तसेच प्राचार्य लता मोरे, दिनेश खरात यांचा समावेश होता. या समितीने ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागात ज्या ठिकाणी विद्यार्थी उच्च शिक्षणात येण्यासाठी आतुर आहेत मात्र संधी नाही अशा परिसराचा शोध घेतला. त्यासाठी पाच ते सहा वेळा समितीने सर्वेक्षण केले. त्यानंतर बहुतांश आदिवासी लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावी विद्यापीठ संचलित (कंडक्टेड) महाविद्यालय सुरु करता येईल, असा अहवाल व्यवस्थापन परिषदेला सादर केला होता. या अहवालाला व्यवस्थापन परिषदेने संमती दिली. या महाविद्यालयासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. 

प्रवेश प्रक्रिया सुरु 
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मोलगी येथील हे वरिष्ठ महाविद्यालय सुरु होत असून विज्ञान व वाणिज्याच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतीचे सभागृह व खासगी जागा घेऊन महाविद्यालय सुरु होणार असून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विद्यापीठाने जागा मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या परिसरातील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नितीन वळवी (९४०४८१७१००) यांच्याशी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bahinabai university Decision new collage open nandurbar district