डॉ. प्रमिला भिरूड यांची अशीही "बहिणाई वंदना' 

डॉ. प्रमिला भिरूड यांची अशीही "बहिणाई वंदना' 

जळगाव : जलमली बहिणाई....साऱ्या मुल्खाची पुण्याई.....असोद्याची ही लाडाई.....गेली सांगून गीताई ! अरे माणसा माणसा....ठेव ध्यानात ही खूण.....बहिणाबाईचं गाणं....तुझं गीता रामायण ! अशा शब्दात निसर्गकन्या तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विचारांचा ठेवा डॉ. प्रमिला भिरूड यांनी समाजाला सांगितला. अशिक्षित असूनही आपल्या कवितांच्या जोरावर खानदेशचे नावलौकिक करणाऱ्या बहिणाबाईंना डॉ. भिरूड यांनी "एकवीस कवितांनी' बहिणाई वंदना दिली आहे. 

खिरोदा (ता.रावेर) येथील शेतकरी कुटुंबात सन 1938 ला डॉ. प्रमिला भिरूड यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण हे फैजपूर (ता.यावल) येथे झाले. दहावी उत्तीर्ण होताच 1958 साली डॉ. भिरूड यांचा जळगावातील घन:श्‍याम भिरूड यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर तब्बल पाच वर्षानंतर प्रमिला यांनी शिक्षणास पुन्हा सुरवात केली व सन 1982 साली पुणे विद्यापीठातून "मराठी कादंबरीत स्त्री लेखिकांनी घातलेली भर' या विषयावर पीएच.डी संपादन केली. यानंतर प्राध्यापक, प्राचार्य पदी काम केले. हे काम करत असताना डॉ. भिरूड यांना कवितांची व वाचनाची आवड असल्याने त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्यावर पुस्तके लिहिण्याचा निर्धार केला व आज त्यांची फक्त बहिणाबाईंची दहा पुस्तके प्रकाशित झाली आहे. 
 
बहिणाईचा प्रवास 
सरसोतीची ही लेक......नही शाळेत शिकली....परी जीवनाची शाळा....कशी तिनं उघडली ! गाण्याचा हा येल गोड.....बहरला तिच्या उरी.....गेला वाढता वाढता.....उच्च्या आभायाभीतरी.......अशा शब्दात प्रमिला यांनी बहिणाईच्या जीवनापासून ते त्यांच्या काव्यांपर्यंतचा प्रवास अगदी मार्मिक शब्दात मांडला आहे. 

विविध भाषांचा समावेश 
डॉ. प्रमिला भिरूड या मराठी भाषिक जरी असल्या तरी बहिणाबाईंचे जीवनकार्य व त्यांचे विचार सर्वच लोकांपर्यंत पोचावे यासाठी त्यांनी आपल्या पुस्तकाचे मराठी, हिंदी, इंग्रजी व कानडी भाषांमध्ये भाषांतर केले आहे. यासोबतच प्रज्ञाचक्षू व्यक्‍तींसाठी त्यांनी ब्रेल लिपीमध्ये देखील आपली पुस्तके व सीडी प्रकाशित केली आहे. 
 
प्रकाशित झालेले साहित्य 
बहिणाईची गाणी : एक अभ्यास, बहिणाईची गाणी : अमृतवाणी (ऑडिओ कॅसेट, सीडी), मी बहिणाई : ग्रामीण बोलीभाषेतील आत्मकथन, बहिणाई की कविता : एक अध्ययन (हिंदी), बहिणाईची जीवन कहाणी (बहिणाबाईचं काव्यमय चरित्र) ब्रेल लिपीत भाषांतर, बहिणाईची अपूर्वाई, बहिणाईची गाणी : अमृतवाणी - एक रसास्वाद, माय बहिणाई : गाते शाहिराची वाणी (पोवाडा गीत), बहिणाई वंदन. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com