जैन हिल्सवर साकारणार नेमाडेंची हिंदू-२ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

जळगावः- हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, या जगभर गाजलेल्या कादंबरीचा बहुप्रतिक्षीत दुसरा भाग सहा महिन्यांत लिहून पूर्ण करणार असल्याचे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांनी सांगितले. जैन हिल्स येथे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेष म्हणजे हिंदू पार्ट टू चे संपूर्ण लिखाण हे जळगावच्या जैन हिल्स परिसरात पूर्ण होणार आहे. 

भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ही कादंबरी शिमला येथे लिहून पूर्ण केली होती. त्याला सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागला होता. मात्र आता सलग बसून लिहिल्यास आपल्याला सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही, कोणत्याही स्थितीत पुढच्या सहा महिन्यांत आपण लिखाण पूर्ण करु हा माझा शब्द आहे, असे नेमाडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, कोणतेही लेखन करताना आजच्या समाजाचे चित्रण मांडावे लागते. पात्र, प्रसंग हे तत्कालीन घ्यावे लागतात, त्याशिवाय ते वाचनीय आणि चिरंतन ठरत नाही. हिंदू पार्ट टू च्या लिखाणाला गुरुवार, ५ सप्टेंबरपासून सुरुवात केलेली आहे. 

जैन हिल्समध्ये लिखाण
भालचंद्र नेमाडे यांचे संपूर्ण लिखाण जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू पार्ट टू कधी येणार, असे प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित होत होते. आता पुढील सहा महिन्यांत हिंदूचा दुसरा पार्ट लिहून पूर्ण होणार हे स्पष्ट झालेले आहे. नेमाडे यांच्यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा जैन हिल्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. 

काही युग बोलण्याची, काही न बोलण्याची
भालचंद्र नेमाडे यांच्या संदर्भातील भवरलाल जैन यांची आठवण ना. धों. महानोर यांनी सांगितली. नेमाडे तुम्ही फार बोलू नका, पण भरपूर लिहा, असे भवरलाल जैन यांनी म्हटले होते. त्यावर नेमाडे लगेचच म्हटले की काही युग बोलण्याची असतात, तर काही न बोलण्याची. सध्याचे युग न बोलण्याचे आहे. 

नेमाडे दादा जळगावी या -अशोक जैन
भालचंद्र नेमाडे यांनी मुंबईतून मुक्काम हलवून कायमचे जळगावला राहायला यावे, अशी गळ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी नेमाडे यांना घातली. नेमाडे यांचे चिरंजीव, सून, नातवंड जळगावी राहायला आलेले आहेत. नेमाडे जळगावला आल्यास शहराच्या, जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल. भालचंद्र नेमाडे हे मूळचे यावल जिल्ह्यातील सांगवी येथील राहणारे आहेत. वर्षातून दहा-पंधरा दिवस ते सांगवीत आवर्जून राहतात, असेही जैन यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhalchandra nemade hindu 2