दिल्लीच्या एजंटाकडून विद्यार्थ्यांची फसवणूक 

live photo
live photo

भुसावळ : नवीदिल्ली येथील रेल्वेच्या अनधिकृत तिकीट एजंटाने दुसऱ्यांच्या नावावर असलेली तिकिटे गोवा फिरण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना विकून फसवणूक केली. मात्र रेल्वे वाणिज्य विभागाच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. ही घटना आज गोवा एक्‍सप्रेसमध्ये घडली. यामुळे सुमारे पाऊणतास भुसावळ स्थानकावर गाडीचा खोळंबा झाला. 

नवीदिल्ली परिसरातील सुमारे 54 विद्यार्थी आज गोवा फिरून मडगाव येथून रेल्वे गाडीने क्रमांक (12779) शयनयान आरक्षित डबा क्रमांक एस-8 व एस-9 यातून हजरत निजामुद्दीन येथे परतीच्या प्रवासात जात होते. त्यांच्याकडील तिकिटे व ओळख पुराव्यांवर संशय आल्याने गाडीमधील तिकीट तपासणी विभागाने रेल्वे वाणिज्य नियंत्रण कक्ष, भुसावळ येथे माहिती कळविली. ही गाडी भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (कोचिंग) श्‍याम कुळकर्णी, मुख्य तिकीट निरीक्षक एन. पी. पवार, वाय. डी. पाठक, एस. पी. मालपूरे, पी. एम. पाटील, पी. व्ही. ठाकूर, उमेश कालोसे, रफीक कादर, बी. एस. महाजन, विवियन रॉड्रिक्‍स, विनय सचान, सी. आर. गुप्ता, एस. ए. दहिभाते, ए. एम. खान, जावेद कुरेशी आदींनी विद्यार्थ्यांच्या तिकिटांची बारकाईने तपासणी केली. 

या तपासणीत विद्यार्थ्यांची तिकिटे व ओळख पुराव्यात साम्य नसल्याने सुमारे 28 प्रवासी विद्यार्थ्यांकडून 40 हजार 180 रुपये रोख दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे गाडीला भुसावळ स्थानकावर सुमारे 50 मिनिटे खोळंबा होऊन अजूनही गाडीला उशीर होऊ नये व अन्य प्रवासी विद्यार्थ्यांकडून दंड वसुलीसाठी वाणिज्य विभागाने गोवा एक्‍सप्रेसमध्ये तिकीट तपासणीसांच्या 5 जणांचे पथक सोबत रवाना करण्यात आले. त्यांनी भुसावळ-खंडवा दरम्यान 23 विद्यार्थ्यांकडून 33 हजार 5 रुपये असा एकूण 73 हजार 185 रुपये दंड वसूल केला. उर्वरित 3 जणांची तिकिटे नियमित निघाले. नवीदिल्ली येथील चंदन नगरातील पियुष घुटानी नामक एजंटाने हे तिकीट विद्यार्थ्यांना विक्री केले होते. नवीदिल्ली सह देशभरात बेकायदेशीर तिकीट विक्री करणाऱ्या दलालांचे रॅकेट कार्यरत असल्याचे अशा प्रकरणावरून सिद्ध होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com