जंक्शन स्थानकात प्रवासी असुरक्षित 

चेतन चौधरी
मंगळवार, 12 मार्च 2019

भुसावळ : मध्य रेल्वेत भुसावळ रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त आहे. तसेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे यार्ड भुसावळला आहे. दररोज दोनशेच्यावर गाड्यांमधून हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी रेल्वेची स्वतःची अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले आहे. रेल्वे स्थानक ‘मॉडेल’ होत असताना स्वतंत्र अग्निशमन दल तर सोडाच, ‘फायर-फायटर’ सारखे साधे उपकरणे देखील नाहीत, त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. 

भुसावळ : मध्य रेल्वेत भुसावळ रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त आहे. तसेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे यार्ड भुसावळला आहे. दररोज दोनशेच्यावर गाड्यांमधून हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी रेल्वेची स्वतःची अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले आहे. रेल्वे स्थानक ‘मॉडेल’ होत असताना स्वतंत्र अग्निशमन दल तर सोडाच, ‘फायर-फायटर’ सारखे साधे उपकरणे देखील नाहीत, त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. 
गीतांजली एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीला शिरसोली जवळ आग लागल्याची घटना आज (ता. ११) घडली. यावेळी जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. देशभरात विस्तीर्ण जाळे असलेल्या रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टने अग्निशमन यंत्रणा असणे आवश्‍यक आहे. भुसावळ स्थानकावर आठ फलाट आहेत. यात आता दोन फलाट नव्याने वाढविण्यात येत असून याची संख्या दहावर जाईल. या ठिकाणी देशाच्या कुठल्याही भागात जाण्यासाठी रेल्वेची सुविधा आहे. यातून हजारो प्रवासी दररोज ये-जा करीत असतात. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे कॅन्टीन आहे. येथे दिवसभर गॅसवर स्वयंपाकाचे काम सुरू असते. तसेच मालगाड्यांच्या साहाय्याने पेट्रोल, डिझेल, कोळसा यांसारख्या ज्वलनशील पदार्थांची वाहतूक केली जाते. यादरम्यान, आग लागण्याचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये केवळ फायर एक्सट्युजन्स बसविण्यात आले आहे. मात्र, भीषण आग असल्यास एक्सट्युजन्सने ती विझविता येणे शक्य नाही. तसेच फायर एक्सट्युजन्स चा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना नसल्याने आग लागल्यास याचा उपयोग कर्मचारी करतील कसा? आणि आग विझवतील तरी कशी? 
 
प्रकल्पांमध्येही सुरक्षा नाहीच 
शहरात रेल्वे स्थानक, डिआरएम कार्यालय, पीओएच, एमओएच असे विविध प्रकल्प आहेत. याठिकाणी हजारो कर्मचारी काम करतात. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी देखील रेल्वे प्रशासनाने अग्निशमन यंत्रणा बसविलेली नाही. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. रेल्वेच्या पीओएच शेडमधील स्क्रॅप गोडाऊनला अनेकदा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. याठिकाणीही केवळ फायर एक्सट्युजन्स शिवाय दुसरे कोणतेही उपकरणे नाहीत. 

रेल्वेच्या विद्युत रेल्वे कारखाना (पीओएच) तसेच एमओएच येथे आगीच्या घटना रोखण्यासाठी फायर एक्सट्युजन्स बसविण्यात आले आहेत. तसेच ज्या स्क्रॅप गोडाऊनला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. तेथील कचरा तब्बल १२०० टन कचरा काढण्यात आला आहे. त्यामुळे आग लागण्याची शक्यता नाही. 
- शिव राम, मुख्य कारखाना प्रबंधक. भुसावळ. 
 
रेल्वे स्थानकावर आगीच्या घटना रोखण्यासाठी फायर एक्सट्युजन्स बसविण्यात आले आहेत. याची मुदतीत रिफीलींग केली जाते. तसेच रेल्वे डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी लावण्यात आलेल्या पाइपचा वापर आग विझविण्यासाठी होऊ शकतो. 
मनोजकुमार श्रीवास्तव, स्टेशन व्यवस्थापक, भुसावळ 
 
रेल्वेत आगीच्या घटना घडल्यास त्यावर यंत्रणाच नाही. रेल्वे स्थानकावर केवळ काही अधिकाऱ्यांच्या कक्षात फायर एक्सट्युजन्स बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याची वेळेवर रिफीलींग करणे गरजेचे आहे. तसेच याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. परंतु प्रशिक्षणाअभावी कर्मचाऱ्यांना याचा वापरच करता येत नाही. 
- ललित मुथा, अध्यक्ष, रेल कामगार सेना. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bhusawal janction railway