भुसावळ विभाग मध्य रेल्वेचे हृदय : देवेंद्रकुमार शर्मा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

भुसावळ ः संपुर्ण रेल्वेचे मध्य रेल्वे हृदय आहे तर मध्य रेल्वेचे हृदय भुसावळ विभाग आहे. रेल्वे वाहतुकीत महत्वाची भुमिका निभावणाऱ्या या विभागाचे विविध क्षेत्रातील काम कौतुकास्पद असल्याचे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बडनेरा-भुसावळ दरम्यान वार्षिक तपासणी दौऱ्या निमित्त शर्मा आले होते. 

भुसावळ ः संपुर्ण रेल्वेचे मध्य रेल्वे हृदय आहे तर मध्य रेल्वेचे हृदय भुसावळ विभाग आहे. रेल्वे वाहतुकीत महत्वाची भुमिका निभावणाऱ्या या विभागाचे विविध क्षेत्रातील काम कौतुकास्पद असल्याचे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बडनेरा-भुसावळ दरम्यान वार्षिक तपासणी दौऱ्या निमित्त शर्मा आले होते. 
शर्मा यांनी आज सकाळपासून बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, शेगाव या स्टेशनचीच व परिसराची पाहणी केली. सोबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी, मुख्य अभियंता एस. के. अग्रवाल, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक शैलेंद्रकुमार, डी. के. सिंह, विभागीय व्यवस्थापक आर. के. यादव, सुनील मिश्रा आदी अधिकारी होते. 
श्री. शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाले की, भुसावळ विभाग हा सर्वात जुनाआहे. स्वच्छता व सौदर्यीकरणाच्या बाबतीत भुसावळ विभागाने चांगले काम केले आहे. नवीन फलाट, सरकते जीने, विश्रामगृह आदी कामे पूर्ण झाली आहेत. तसेच प्रवाश्‍यांच्या सुविधेसाठी विविध विकास कामे प्रगती पथावर आहेत. साधारणपणे बहुतेक ठिकाणी सौदर्यीकरणात रेल्वे इंजिन किंवा रेल्वेचा डबा ठेवला जातो. पण भुसावळ रेल्वेस्थानका बाहेर रनगाडा बसविण्याची कल्पना विभागीय व्यवस्थापक आर. के. यादव यांची असुन त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. 

पाचोरा-जामनेर-बोदवड मार्गाचा प्रस्ताव 
भुसावळ विभागात पाचोरा-जामनेर रेल्वे मार्ग बोदवडला जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला असुन त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरवात होईल. भुसावळला रेल्वेची माहिती देणारी हेरीटेज गॅलरी साकार होत आहे. अशी माहीती शर्मा यांनी दिली. 

भुसावळ-मुंबई एक्‍सप्रेसला प्रतिसाद नाही 
प्रवाश्‍यांच्या मागणी नुसार भुसावळ-मुंबई एक्‍सप्रेस प्रायोगिक तत्वावर सुरु केली होती. मात्र तिला अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्याने ती बंद करण्यात आली. मात्र भुसावळ-सुरत मार्गे मुंबई अशी गाडी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. 
 
ताशी 125 किलोमीटर वेगाची यशस्वी चाचणी 
जीएम स्पेशल गाडीची बडनेरा-भुसावळ दरम्यान ताशी 125 किलोमीटर वेगाने धावण्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. साधारणपणे या मार्गावर ताशी 110 किलोमीटर वेगाने गाड्या धावत असतात. आजच्या यशस्वी चाचणीमुळे भविष्यात गाड्यांचा वेग वाढून कमी वेळेत प्रवाश्‍यांना परगावला पोहचता येणार आहे. 
 
राज्यसरकार व रेल्वेचे एकत्रीत कॉरर्पोरेशन 
राज्यात रेल्वेचे विविध प्रकल्प पुर्ण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र स्टेट रेल्वे कॉरर्पोरेशनची निर्मिती करण्यात आली असुन त्याव्दारे नाशिक-पुणे, वर्धा-यवतमाळ-नांदेड आदी नवे मार्ग सुरु केले जाऊ शकतात. असेही शर्मा यांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon bhusawal railway junction madhya rail