भाजप, सेनेच्या इच्छुकांची उडाली झोप 

सुधाकर पाटील
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

राज्यात सेना-भाजपची गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुटलेल्या युतीचे पुन्हा सूत जुळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांत गेल्या चार वर्षांपासून भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर तयारी करत असलेल्या इच्छुक उमेदवारांची अक्षरशः झोप उडाली आहे. त्यामुळे युती झाल्यास हे इच्छुक उमेदवार काय भूमिका घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

राज्यात सेना-भाजपची गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुटलेल्या युतीचे पुन्हा सूत जुळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांत गेल्या चार वर्षांपासून भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर तयारी करत असलेल्या इच्छुक उमेदवारांची अक्षरशः झोप उडाली आहे. त्यामुळे युती झाल्यास हे इच्छुक उमेदवार काय भूमिका घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सेना -भाजपची पंचवीस वर्षांपासूनच्या युतीने फारकत घेत स्वतंत्र निवडणुका लढल्या. पूर्वापार सेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात भाजपने नव्याने उमेदवार तयार करून त्यांना तयारी करायला लावली, तर भाजपच्या मतदारसंघात सेनेने उमेदवार तयार केले. त्यानंतर जिल्ह्यातही जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या लढल्या. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या मतदारसंघात उमेदवार तयार करून तयारी केली आहे. मात्र, आता पुन्हा युतीची चर्चा जोर धरत असल्याने चार वर्षांपासून उमेदवारीच्या दृष्टीने तयारी चालवलेल्या इच्छुक दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची चांगलीच घालमेल होताना दिसत आहे. 

पाचोरा मतदार संघाची स्थिती पाहिली, तर हा मतदारसंघ सेनेकडे आहे. मात्र, चार वर्षांपासून अनेक इच्छुकांनी भाजपकडून उमेदवारीवर डोळा ठेवून जोरदार तयारी चालविली आहे. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, पालिकेचे माजी गटनेते अमोल शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डी. एम. पाटील, "बेटी बचाव बेटी पढाव'च्या राज्य समन्वयिका प्रा. अस्मिता पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर काटे यांनी तयारी चालविली आहे. एरंडोल मतदारसंघात गेल्या वेळी पराभूत झालेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी तर आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आहे, या आविर्भावात कार्यक्रमाची रेलचेल सुरू केली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये पी. सी. पाटील यांनी उमेदवारीच्या दृष्टीने पाच वर्षांत कंबर कसली आहे. पण युती झाल्यास एरंडोल व जळगाव ग्रामीण हे दोन्ही मतदारसंघ सेनेच्या वाट्याला जातात. त्यामुळे आपोआप भाजपच्या इच्छुक उमेदवारांची दांडी गुल होणार आहे. 

मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजप बालेकिल्ला आहे. मात्र, गेल्यावेळी येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी केली होती. त्यांनीही सेनेच्या उमेदवारीच्या दृष्टीने तयारी चालविली आहे. त्यामुळे चार वर्षांपासून तयारी करत असलेले इच्छुक उमेदवार युतीच्या शक्‍यतेने हैराण झाले आहेत. ही परिस्थिती जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण राज्यातही पहायला मिळत आहे. 

नेत्यांच्या निवडणुकीला युती का? 
गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीपासून साडेचार वर्षांत राज्यातील प्रत्येक निवडणुका या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे नेत्यांच्या निवडणुकीला युती अन्‌ कार्यकर्त्याच्या निवडणुकीला फारकत या "नेते तुपाशी अन्‌ कार्यकर्ते उपाशी' या भूमिकेने शिवसेना आणि भाजपचे सामान्य कार्यकर्ते संतप्त आहेत. 

इच्छुकांना थांबविण्याचे आव्हान 
भाजप-सेनेचे प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांना तिकीट देण्याच्या आशेने तयारीला लावले होते. त्यामुळे इच्छुक ही आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या आशेवर जोरदार कामाला लागले. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून युतीचे वारे घोंघावत असल्याने युती झाल्यास आपल्या उमेदवारीचे काय, असा प्रश्न इच्छुकांना सतावतो आहे. त्यातील काही उमेदवार तर तिकीट मिळो वा ना मिळो, उमेदवारी करायचीच यावर ठाम आहे. त्यामुळे भाजपने तयार केलेले उमेदवार हे युतीसाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यांना थांबविण्याचे आव्हान युतीसमोर असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP Shena election