भाजप- शिवसेनेतील कलह राष्ट्रवादीला तारक ! 

भाजप- शिवसेनेतील कलह राष्ट्रवादीला तारक ! 

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. यात पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ वगळण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुका पूर्ण जळगाव ग्रामीण मतदारसंघात येतो. नव्याने स्थापन झालेल्या मतदारसंघाचे पहिले नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी विजय खेचून आणला. सध्याची स्थिती पाहता लोकसभेत भाजप- शिवसेनेतील अंतर्गत कलह "राष्ट्रवादी'ला तारक ठरण्याची चिन्हे आहेत. 

धरणगाव तालुक्‍यात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार कलह सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी धरणगाव शिवसेना कार्यालयात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत भाजप उमेदवाराचे काम शिवसेनेचे कार्यकर्ते करणार नाहीत असा ठराव करण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, दोन दिवसापूर्वी "सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत वाघ यांनी युती धर्म आणि पक्षादेश पाळून भाजप उमेदवाराचे काम करणार असल्याचे सांगितले. शिवसेनेची ही दोलायमान भूमिका लोकसभा निवडणुकीत "राष्ट्रवादी'ला तारणार असे चित्र सध्या तालुक्‍यात आहे. शिवाय गुलाबराव देवकर लोकसभेला गेले तर गुलाबराव पाटील यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होईल अशी चर्चा देखील जनमानसात आहे. 

जि. प., पं. स.त शिवसेनेचे वर्चस्व 
धरणगाव तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे तीन गट तर पंचायत समितीचे सहा गण आहेत. यापैकी दोन जिल्हा परिषद गटात शिवसेना, तर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. शिवाय पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे तालुक्‍यात शिवसेना आघाडीवर आहे. फक्त जिल्हा परिषदेचा साळवा बांभोरी गट भाजपकडे आहे. यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला कुठेही स्थान नाही. एरंडोल धरणगाव या दोन तालुक्‍यासाठी असलेल्या बाजार समितीत मात्र भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी युती आहे. 
धरणगाव पालिकेत शिवसेनेचे सलीम पटेल लोकनियुक्‍त नगराध्यक्ष आहेत. अटीतटीच्या लढतीत भाजपचे संजय महाजन दुसऱ्या क्रमांकावर होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व आहे. सहकार क्षेत्रात सर्वपक्षीय दिसून येतात. जिल्हा बॅंकेत तालुक्‍याचे एकमेव प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय पवार आहेत. जिल्हा बॅंकेत तिसरी टर्म त्यांची सुरू आहे. सध्या तालुक्‍यात सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी म्हणून फक्त संजय पवार दिसतात. भाजप- शिवसेनेची युती असून, स्थानिक कार्यकर्त्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करीत असताना दुखावलेली मने सहज जोडली जातील असे वाटत नाही. त्यामुळे तालुक्‍यात भाजप उमेदवाराला फटका बसू शकतो. पालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत उल्लेखनीय आहे. भाजप उमेदवाराचे नाव अद्याप निश्‍चित नाही. मात्र उमेदवार बाहेरील तालुक्‍यातीलच असणार आहे एवढे निश्‍चित. याचाही फायदा श्री. देवकरांना धरणगाव तालुक्‍यात होईल अशी स्थिती आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी असल्याने श्री. देवकरांसाठी धरणगाव तालुकाही कंबर कसेल. देवकरांचा विजय झाल्यास भविष्यात जळगाव ग्रामीणची जागा कॉंग्रेस विधानसभेसाठी दावा करू शकते. यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील यांनाही संधी लाभण्याची शक्‍यता आहे. भाजप- शिवसेनेची युती लोकसभा व विधानसभेसाठी झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढती झाल्याने पी. सी. पाटील भाजपचे उमेदवार होते. त्यांनीही जोरदार लढा दिला होता. येणाऱ्या विधानसभेसाठी भाजपकडून संजय महाजन हेही प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र, युती झाल्याने दोघांचा हिरमोड झाला आहे. 
 
मतदारसंघातील समस्या 
- बालकवी स्मारकाचे काम अपूर्ण. 
- धरणगाव तालुक्‍याचा सिंचनाचा प्रश्‍न गंभीर. 
- क्रीडा संकुलाचे काम अपूर्णावस्थेत. 
- औद्योगिक वसाहत नावालाच, मोठे उद्योग नाही 
- व्यावसायिक शिक्षणाचा अभाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com