"बीएसएनएल'चे आता पेपरलेस बिलिंग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 जानेवारी 2019

जळगाव ः बिलांची छपाई करून त्यांचे घरोघरी वितरण करण्याच्या प्रक्रियेस भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) विराम दिला आहे. नववर्षाच्या सुरवातीपासून "बीएसएनएल'ची छापील बिले इतिहासजमा झाली असून, ग्राहकांना ई-मेल किंवा "एसएमएस' अर्थात "ई-बिल' देण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी सर्वत्र सुरू झाली आहे. 

जळगाव ः बिलांची छपाई करून त्यांचे घरोघरी वितरण करण्याच्या प्रक्रियेस भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) विराम दिला आहे. नववर्षाच्या सुरवातीपासून "बीएसएनएल'ची छापील बिले इतिहासजमा झाली असून, ग्राहकांना ई-मेल किंवा "एसएमएस' अर्थात "ई-बिल' देण्याचा निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी सर्वत्र सुरू झाली आहे. 
भारत सरकारच्या "डिजिटल इंडिया' या कार्यक्रमांतर्गत अनेक कंपन्यांसह शासकीय कार्यालय पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टीने पेपरलेस कामाकडे वळत आहेत. यामुळे छापील बिलांचे वितरण न करता "ई-बिल'च्या माध्यमातून "बीएसएनएल'ने "गो ग्रीन'चा अवलंब करण्यासोबतच दर महिन्याला कागदी बिलांसाठी होणारा खर्च रोखून कोट्यवधींची बचत केली आहे. सध्या लॅंडलाइन आणि पोस्टपेड मोबाईल ग्राहकांना एक ते तीन पानी छापील बिले दिली जात होती. इंटरनेटधारकांना दोन ते तीन पानी बिले द्यावी लागतात; त्यात दूरध्वनी व इंटरनेटच्या वापराचे विश्‍लेषण असते. मात्र, बदलत्या तंत्रयुगात "बीएसएनएल'नेही पेपरलेस बिलिंगची वाट धरली आहे; त्याची अंमलबजावणी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून करण्यास सुरवात केली आहे. 

"एसएमएस' अथवा "मेल'द्वारे बिल 
ग्राहकांकडून "ई-मेल आयडी' व मोबाईल क्रमांक घेण्यात आले आहेत. बिल भरणा केंद्रावर मोबाईल किंवा लॅंडलाइन क्रमांक सांगताच बिल घेतले जाईल. बिल भरण्याकरिता छापील बिलाची आवश्‍यकता राहणार नाही. सर्व संस्थांनाही ई-मेलद्वारेच बिले मिळणार आहेत. त्यांनी हिशेबासाठी गरजेनुसार प्रिंट काढून घ्यायची आहे. "ई-मेल आयडी' नसलेल्या ग्राहकांना मोबाईलवर "एसएमएस'द्वारे बिल कळविले जाणार आहे. तो भरणा केंद्रावर दाखविल्यास बिल घेतले जाणार आहे. लॅंडलाइन असलेल्या ग्राहकांकडूनही मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर बिल पाठविण्यात येणार आहे. यासाठी ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक व "ई-मेल आयडी'ची नोंदणी "बीएसएनएल' कार्यालयात करावी लागणार आहे. 

दहा रुपयांची सवलत 
ग्राहकांना ऑनलाइन बिल भरणा करण्यासाठी "बीएसएनएल'कडून "माय बीएसएनएल ऍप'चा पर्याय दिला आहे. हे ऍप डाऊनलोड करून ग्राहकांना बिल भरणा येणार आहे. मुख्य म्हणजे पेपरलेस बिलिंगचा वापर करणाऱ्या ग्राहकांना "बीएसएनएल'ने प्रत्येक बिलात दहा रुपयांची सूट देण्यात येत आहे. पुढील बिल दहा रुपये वजा होऊनच मिळेल. 
 

Web Title: marathi news jalgaon BSNL paperlace bill