मानेवर रसायन टाकून तोडली महिला वकिलाची पोत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

जळगाव ः येथील फुले मार्केटमध्ये खरेदी करून बाहेर पडताना मानेवर रासायनिक द्रावण टाकून ऍड. पूजा ओमप्रकाश व्यास (रा. बालाजीपेठ) यांच्या गळ्यातील साडेपाच ग्रॅमची सोनसाखळी तोडून जीन्स पॅन्ट व टी-शर्ट परिधान केलेल्या तरुणीने पळ काढला. मात्र, बाजारातील गर्दीला बाजूला सारत मुख्य रस्त्यापर्यंत पाठलाग करून पोलिसांच्या मदतीने तिला पकडले. हर्षदा किशोर महाजन (वय 19, रा. बोदवड, जि. जळगाव) असे संबंधित तरुणीचे नाव आहे. ती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात "बीबीएम'च्या दुसऱ्या वर्षाला असून, वसतिगृहात राहते. 

जळगाव ः येथील फुले मार्केटमध्ये खरेदी करून बाहेर पडताना मानेवर रासायनिक द्रावण टाकून ऍड. पूजा ओमप्रकाश व्यास (रा. बालाजीपेठ) यांच्या गळ्यातील साडेपाच ग्रॅमची सोनसाखळी तोडून जीन्स पॅन्ट व टी-शर्ट परिधान केलेल्या तरुणीने पळ काढला. मात्र, बाजारातील गर्दीला बाजूला सारत मुख्य रस्त्यापर्यंत पाठलाग करून पोलिसांच्या मदतीने तिला पकडले. हर्षदा किशोर महाजन (वय 19, रा. बोदवड, जि. जळगाव) असे संबंधित तरुणीचे नाव आहे. ती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात "बीबीएम'च्या दुसऱ्या वर्षाला असून, वसतिगृहात राहते. 
शहरातील घर क्र. 102, बालाजी पेठ येथे ऍड. पूजा ओमप्रकाश व्यास या आई-वडील, बहिणीसह वास्तव्यास असून त्या विधी महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. आज रविवार असल्याने दुपारी एकला बहीण आरतीसमवेत त्या फुले मार्केटमध्ये काही खरेदीसाठी आल्या होत्या. दोन्ही बहिणी खरेदीनंतर दीडच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यासमोरील नूतन ड्रायफूट या दुकानासमोरून चालत जात असताना तोंडाला स्कार्प बांधलेल्या तरुणीने दोघांच्या मानेवर रासायनिक द्रावण टाकले. अंगावर अचानक काय पडले म्हणून मागे वळून पाहिले असता जीन्स पॅन्ट-टी-शर्ट परिधान केलेल्या तरुणीने ऍड. पूजा यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडत पळ काढला. 

तरुणीचा पाठलाग 
गळ्यातील सोनसाखळी तोडल्याचे लक्षात येताच ऍड. पूजा यांनी आरडाओरड करीत चोरट्या तरुणीचा पाठलाग केला. आरडाओरड ऐकून शहर पोलिस ठाण्यातील सुनील पाटील, भरत ठाकरे, सुधीर सावळे, प्रनेश ठाकूर, रवींद्र साबळे, नवजीत चौधरी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर या तरुणीला ताब्यात घेतले. यावेळी तिच्या हातात ऍड. पूजा यांची साडेपाच ग्रॅमची (20 हजार रुपये किमतीची) लांबविलेली सोनसाखळी मिळाल्यावर तिला पोलिस ठाण्यात आणले. 

हर्षदा सधन शेतकऱ्याची मुलगी 
संशयित तरुणीला ताब्यात घेतल्यावर चौकशीवेळी सुरवातीला "सोनसाखळी माझीच आहे. धक्का लागला म्हणून वाद झाला. मी चोर नाही', असे म्हणत तिने दिशाभूल केली. मात्र, पोलिसांनी दम भरल्यावर तिने चोरीची कबुली दिली. हर्षदा महाजन असे तिचे नाव असून, विद्यापीठात "बीबीएम'च्या दुसऱ्या वर्षाला आहे. शिक्षणासाठी वसतिगृहात राहते. चौकशीनंतर पोलिसांनी बोदवड पोलिसांमार्फत तिच्या कुंटुबीयांना हा प्रकार कळविला. माझ्या घरी 60 एकर शेती असून, वडील सधन शेतकरी असल्याचे हर्षदा सांगते. तिच्याकडील रासायनिक द्रावण असलेली बाटली व बॅग पोलिसांनी जप्त केली. 

चोरीचा नवा ट्रेंड 
सोनसाखळी तोडण्याचे गुन्हे अट्टल गुन्हेगारांकडून होत असतात. मात्र, सधन कुटुंबातील विद्यार्थिनी असलेल्या तरुणीकडून चोरीचा प्रकार घडल्याने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. अंगावर रासायनिक द्रावण टाकून सोनसाखळी तोडण्याचा प्रकार आजवर अट्टल गुन्हेगारांनीही केलेला नसताना या तरुणीकडून मिळालेले द्रावण नेमके कसले आहे, यासाठी रासायनिक पृथक्‍करण प्रयोगशाळेत पाठविले जाणार असल्याचे निरीक्षक अरुण निकम यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही व्यास भगिनींना जिल्हा रुग्णालयात उपचार करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येऊन ऍड. पूजा व्यास यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हर्षदा राहत असलेल्या विद्यापीठातील वसतिगृहातील खोलीची झडती घेतल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon camical woman gold chaine