सीसीआय' केंद्रावरील "रनर' गेला तरी कुठे? -शेतकऱ्यांचे अडकले पेमेंट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

बस बंदमुळे वाहन नाही 
हे "रनर' पूर्वी एस.टी. बसने औरंगाबादला जायचे. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनाची गरज आहे. हे वाहन उपलब्ध करून देणे, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणे व इतर परवानगीची आवश्‍यकता आहे. सीसीआयचे चुकारे वितरण करण्यासंबंधी औरंगाबादेतील एका खासगी बॅंकेतर्फे कार्यवाही केली जाते. या बॅंकेतील दोन कर्मचारी "कोरोना'ग्रस्त आढळल्याने ही बॅंक दहा दिवस बंद होती. यामुळेही चुकारे वितरणास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जळगावः खानदेशातील अनेक शेतकऱ्यांचे शासकीय कापूस खरेदी केंद्रात विकलेल्या कापसापोटी लाखो रुपये (चुकारे) कापूस महामंडळ (सीसीआय) व पणन महासंघाकडे अडकले आहेत. चुकारे अदा करणारा "रनर' कार्यरत नसल्याने चुकारे अडकले आहेत. तो "रनर' कार्यरत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
"लॉकडाउन'च्या काळात ज्या शेतकऱ्यांनी कापसाची सीसीआय व पणन महासंघाच्या केंद्रात विक्री केली त्या सर्व शेतकऱ्यांना चुकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. अशातच हे चुकारे अदा करण्याच्या कार्यवाहीत प्रमुख भूमिका असलेला "रनर' (बिले, खरेदीची माहिती पोचविणारा कर्मचारी) कार्यरत नाही. संबंधित बॅंकेतील दोन कर्मचारी "कोरोना'ग्रस्त झाल्याने बॅंकही दहा दिवस बंद होती. यामुळे हे चुकारे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
खानदेशात पणन महासंघ "सीसीआय'ची उपसंस्था म्हणून कापूस खरेदी करीत आहे. तसेच पाचोरा, भुसावळ, बोदवड, जामनेर, जळगाव, चोपडा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. पणन महासंघाची केंद्र नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, धुळे, जळगावमधील धरणगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल येथे सुरू आहे. या केंद्रात "लॉकडाउन'च्या काळात ज्यांनी कापूस विक्री केली त्या सर्व शेतकऱ्यांचे चुकारे रखडले आहेत. पणन महासंघाने सुमारे 45 हजार क्विंटल तर "सीसीआय'नेदेखील सुमारे 40 हजार क्विंटल कापूस खरेदी "लॉकडाउन'च्या काळात केली आहे. 
खानदेशातील खरेदी केंद्रांचे नियंत्रण, चुकारे अदा करण्याची कार्यवाही सीसीआयच्या औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयातर्फे केली जाते. या कार्यालयात रोज कापूस खरेदीची बिले, इतर माहिती, शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक पोचविले जातात. या कामासाठी सीसीआयतर्फे "रनर'ची नियुक्ती केली जाते. हे "रनर' सध्या कार्यरत नाहीत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cci center runner misssing