...अन्‌ पालकमंत्री "संदेश' घेऊन गेले 

...अन्‌ पालकमंत्री "संदेश' घेऊन गेले 

जळगाव : पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचे दूत बनून आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही तरी "शुभसंदेश' देतील, अशी अपेक्षा खडसे समर्थकांना होती. प्रत्यक्षात, महसूलमंत्र्यांनी कोरड्याच शुभेच्छा दिल्यामुळे खडसे यांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन न्याय मागण्याचा नवीन पवित्रा घेतल्याचे जाहीर केले आणि खडसेंचा हा "संदेश' नेतृत्वापर्यंत पोचविण्याची वेळ पालकमंत्र्यांवरच आली. त्यामुळे खडसेंचा हा पवित्रा पक्षासमोर नवीन आव्हान ठरणार आहे. 
  
एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे तसेच विद्यमान केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले नेतृत्व आहे. या नेत्यांसोबत राज्यात पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. पहिल्यांदा राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यानंतर (कै.) गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते; तर खडसे यांना महत्त्वाचे जलसंपदा, तसेच अर्थखातेही देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून राज्यातील सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. 

पक्षाचे "मास लीडर' 
युतीचे सरकार गेल्यानंतरही त्यांनी पुन्हा विरोधी पक्षात कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या विरुद्ध राज्यात लढा दिला. मुंडे आणि गडकरी केंद्रात गेल्यामुळे महाराष्ट्रातील पक्षाची जबाबदारी "मास लिडर' म्हणून खडसे यांच्यावर होती. त्याच बळावर विधानसभेत स्वतंत्र लढून भाजपला क्रमांक एकवर नेत पक्षाचा मुख्यमंत्री केला. खडसेंना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. मात्र दीड वर्षातच गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणांची चौकशी होऊन त्यातून निर्दोष झाल्याचाही त्यांचा दावा आहे. मात्र, सरकार त्याबाबत घोषणा करीत नसल्यामुळे त्यांची नाराजी आहे. शिवाय त्यामुळे त्यांचा पुढील मार्गही थांबला आहे. 

कोरड्या शुभेच्छांनी हिरमोड 
वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री याबाबतची काही घोषणा करतील, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षाही होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून कार्यक्रमास येत असल्यामुळे ते काही "शुभसंदेश' देणार अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे पालकमंत्री मुक्ताईनगरात खडसेंच्या "मुक्ताई' निवासस्थानी आले. त्या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यानंतर त्यांनी चर्चाही केली. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. त्यामुळे काही तरी घोषणा होण्याचीही अपेक्षा होती. परंतु, मंत्री पाटील यांनी कोणताही शुभसंदेश दिला नाही. त्यामुळे त्यांच्या या कोरड्या शुभेच्छांमुळे खडसे समर्थकांमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक होते. 

पक्षात राहून पक्षासमोर आव्हान 
संघर्षातून पुढे आलेल्या खडसेंना कार्यकर्त्यांची नाळही माहीत आहे. त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा वेधही ते अचूक घेतात. त्यामुळे त्यांनी पक्षांतर्गत होत असलेल्या या अन्यायाविरोधात नवीन पवित्रा घेण्याचा निर्णय याचवेळी केला आणि आपल्या भाषणात तो जाहीरही केला. भाजप न सोडता खडसे राज्यात पक्षांतर्गत झालेल्या आपल्यावरील अन्यायाची जनतेत दाद मागणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत नवीन संघर्ष उभा राहण्याची शक्‍यता असली, तरी त्यांचा तो अधिकार आहे हेसुद्धा मान्य करावेच लागले. चाळीस वर्षे काम केलेल्या नेत्याची विविध आरोपांतून सुटका झाल्यानंतरही जर आपलेच सरकार न्याय देत नसेल, तर त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा त्यांना अधिकार आहे. अर्थात त्याला कोणी "बंड' म्हणेल किंवा "पक्षाच्या विरोधी कारवाई' म्हणेल. खडसे यांचा हा नवीन पवित्रा भाजपलाही निश्‍चित नवीन असेलच. यावर आता नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडेच जनतेचे लक्ष असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com