चॉकलेट गाडीची दुनियाच न्यारी : माजी आमदार गुलाबराव पाटील जोपासताहेत छंद

उमेश काटे
सोमवार, 24 डिसेंबर 2018

अमळनेर : "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' असे साने गुरुजींनी म्हटले आहे. याच उक्‍तीच्या पार्श्‍वभूमीवर साने गुरुजीप्रेमी असलेले माजी आमदार गुलाबराव पाटील रोज सायंकाळी ढेकूसिम येथे चॉकलेट देऊन बालकांमध्ये काही काळ रममाण होतात. त्यांच्या "चॉकलेट गाडी'ची मुले आतुरतेने वाट पाहतात, हे विशेष! 

अमळनेर : "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे' असे साने गुरुजींनी म्हटले आहे. याच उक्‍तीच्या पार्श्‍वभूमीवर साने गुरुजीप्रेमी असलेले माजी आमदार गुलाबराव पाटील रोज सायंकाळी ढेकूसिम येथे चॉकलेट देऊन बालकांमध्ये काही काळ रममाण होतात. त्यांच्या "चॉकलेट गाडी'ची मुले आतुरतेने वाट पाहतात, हे विशेष! 
खानदेशची "मुलूख मैदान तोफ' म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. "साथी गुलाबबापू' म्हणून ते खानदेशात परिचित आहेत. विधानसभेत त्यांनी विविध विषयांवर आपली तोफ डागली आहे. त्यांनी काढलेला शिंगाडे मोर्चा आजही सर्वांच्या स्मरणात आहे. अमळनेर मतदारसंघातून त्यांनी तीनदा आमदारकीचा बहुमानही मिळविला आहे. अहिराणी भाषा टिकावी, रुजावी यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे विधानसभेत अहिराणी भाषेतून शपथ घेणारे ते पहिले आमदार आहेत. राजकीय जीवनात सडेतोड व्यक्तिमत्त्व असणारे गुलाबबापू हे वयाच्या 83 व्या वर्षी साने गुरुजींप्रमाणे मातृहृदयी झालेले दिसून येतात. रोज सायंकाळी ते नित्यनेमाने चारचाकी वाहनाने ढेकूसिम येथे फेरफटका मारायला जातात. तेथील मुलांना व वृद्धांना चॉकलेटवाटपाचा छंद त्यांनी जोपासला आहे. मुलेही रांगेत उभे राहून चॉकलेट घेतात. विशेष म्हणजे रोज सायंकाळी मुले त्यांची आतुरतेने वाट पाहतात. अनेक वृद्धही त्यांच्याकडून चॉकलेट स्वीकारतात. 
 
पाटलांच्या छंदाचा चर्चेचा विषय! 
माजी आमदार पाटील हे साने गुरुजीप्रेमी आहेत. साने गुरुजींचे विचार समाजाभिमुख करण्यासाठी त्यांनी शहरात साने गुरुजींच्या नावाने शैक्षणिक संस्था उभारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे वाहनचालक अरुण होलार परत येताना पोलिस ठाण्याच्या जवळ वाहन थांबवितात. त्यानंतर गुलाबराव पाटील त्यांच्या मदतीने काही अंतर पायीही जातात. त्यांचा चॉकलेटवाटपाचा हा छंद तालुक्‍यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: marathi news jalgaon choclate moter gulabrao patil