होय.. जळगावातही "सोलापुरी पॅटर्न' राबवूच : जिल्हाधिकारी, प्रभारी आयुक्त डॉ.ढाकणे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 मार्च 2020

"सकाळ' ने आज "आयुक्त साहेब....स्वच्छतेचा सोलापुरी पॅटर्न जळगावात आणा' अशी बातमी देवून शहरातील अस्वच्छतेवर प्रकाशझोत टाकला होता. त्यापार्श्‍वभूमीवर डॉ.ढाकणे बोलत होते.

जळगाव : शहरातील स्वच्छतेचा ठेका असलेल्या वॉटर ग्रेस कंपनीकडे पुरेशी माणसे नाहीत, जी आहेत ती व महापालिकेची काही मिळून काही भागात स्वच्छतेचे काम सुरू आहे. संपूर्ण स्वच्छ सुंदर करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. वॉटर ग्रेस कंपनीने दोन दिवसात शहरात स्वच्छता पूर्ववत करावी, अन्यथा कारवाई करून पर्यायी विचार केल्याशिवाय गत्यंतर नसेल. "सोलापुरी पॅटर्न' राबवून शहर स्वच्छ करून, अनेक अडचणी आहेत. त्यावर मार्ग काढून जळगावकराचे आरोग्य निरोगी सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी अनेक प्लॅन तयार केले आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी करू अशी माहिती जिल्हाधिकारी, महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी 'सकाळ' ला दिली. 

हेपण वाचा - "निर्नायकी' अवस्थेनं खानदेशचं नशीब फुटकंच..!
 
आयुक्त डॉ.ढाकणे यांनी सांगितले, की महापालिकेने शहरात स्वच्छतेसाठी वॉटर ग्रेस कंपनीला ठेका दिला आहे. त्याप्रमाणे कंपनीने शहरात स्वच्छता केलीच पाहिजे. सुमारे साडेपाचशे कर्मचारी रोज हवीत. मात्र कंपनी तुटपुंज्या कर्मचाऱ्यावर काम करते. यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता राहते. असे व्हायला नको. जर कंपनीला काम झेपावत नसेल तर तसे सांगावे, दोन दिवसात पर्याप्त व्यवस्था कंपनीने न केल्यास स्वच्छता करण्याबाबत काय वेगळा निर्णय घ्यायचा तो मी घेईन. शहरातील स्वच्छतेचे काम मला हवे. ते न झाल्यास अनेक प्लॅन माझ्याकडे आहेत. 

क्‍लिक करा - सापडलेल्या एक लाख रूपयांच्या बॅगसोबतचा प्रवास...पांडूरंगाच्या दर्शनापेक्षाही दिले याला प्राधान्य 

नागरिकांनी सहकार्य करावे 
घंटागाड्या नेण्यासाठी वॉटर ग्रेस कंपनीकडे माणसे नाही. महापालिकेची माणसे मी दिली. तरी ती कमी पडताहेत. स्वच्छतेचे काम एकदम बंद पडल्याने एकावेळी सर्व शहराची स्वच्छता होणार नाही. नागरिकांनी, हॉटेल व्यावसायिकांनी कचऱ्यावर कचरा न टाकता, काही दिवस घराबाहेर कचरा न टाकल्यास अधिक परिसरात अस्वच्छता होणार नाही. स्वच्छता करण्याचा तिढा लवकरच सुटेल तोपर्यंत सहकार्य करावे. 
 
काही प्लॅन असे 
- स्वच्छता करण्याचा तिढा सुटल्यानंतर सर्व घंटागाड्यांवर "जीपीएस' प्रणालीद्वारे कंटोल केले जाईल. 
- कंत्राटदाराला कोणत्या एरियात किती गाड्या, कितीवेळा जातील, कोण चालक असेल त्याचा मोबाईल क्रमांक देणे बंधन कारक करू. 
- स्वच्छता करणाऱ्याच्या ड्यूटीच्या वेळा फिक्‍स केल्या जातील. त्यांना सकाळी सात, अकरा, दुपारी तीन अशा तीन वेळा बायोमेट्रीकद्वारे हजेरी लावणे बंधनकारक होईल. 
- टेक्‍नॉलॉजीच्या साहाय्याने महापालिकेत एका कक्षात कर्मचारी बसवून ऍपद्वारे सर्व घंटागाड्या जोडल्या जातील, प्रत्येक प्रभागातील रस्तेही जोडले. कोणत्या गाडीने कोणता भाग स्वच्छ केला, कोणता बाकी आहे याची माहिती त्याला संगणकावरच कळेल. तसा तो अहवाल रोज देईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city swach bharat corporation commissioner dhakne sakal news impact