सिव्हिल'मध्ये कॅन्सरग्रस्त महिलेला जीवदान 

सिव्हिल'मध्ये कॅन्सरग्रस्त महिलेला जीवदान 

जळगाव ः पिंप्राळ्यातील मीनाक्षी गुलाबसिंह पाटील या महिलेच्या गळ्यात गाठ झाल्याने थायरॉईड ग्रंथीच्या कॅन्सरची किचकट शस्त्रक्रिया करावी लागली. ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात यशस्वीपणे करून महिलेला जीवदान मिळाले आहे. 
गळ्यातील थायरॉईड ग्रंथीमध्ये साध्या प्रकारच्या गाठी महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात. पण प्रदीर्घ काळ म्हणजे आठ ते दहा वर्षांपर्यंत गाठ राहिल्यास त्यात कॅन्सर उद्‌भवण्याची शक्‍यता असते. तसेच गळ्यातील थायरॉईडची गाठ छातीच्या पिंजऱ्यामध्ये वाढू लागते आणि त्यामुळे श्‍वसनमार्ग आणि अन्ननलिकेवर दबाव निर्माण होऊन अन्नपाणी गिळण्यास त्रास होतो. गळ्यातील व छातीत एकाच बाजूने वाढलेल्या गाठीमुळे श्‍वसननलिकेवर दाब येऊन ती वक्राकार होते; अशावेळी शस्त्रक्रियेसाठी भूल देणे अवघड होते. त्यामुळे रुग्ण शुद्धीवर असताना दुर्बिणीद्वारे श्‍वसननलिकेत ट्यूब टाकून भूल द्यावी लागते. शिवाय शस्त्रक्रियेमध्ये उद्‌भवणाऱ्या दुष्परिणामांची शक्‍यताही वाढते. यामुळे अतिस्राव होऊन आवाज घोगरा होणे, थायरॉईडलगतच्या पॅराथायरॉईड ग्रंथीला इजा होऊन रक्तातील कॅल्शिअम कमी होणे, हातापायांना मुंग्या येणे व हाताची बोटे वळणे. त्यासाठी प्रदीर्घ काळ कॅल्शिअमच्या गोळ्या घ्याव्या लागतात. असाच प्रकार शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या मीनाक्षी गुलाबसिंह पाटील यांच्याबाबत घडला होता. 
रुग्ण महिलेच्या गळ्यातील शस्त्रक्रियेसाठी भूल देणे अवघड असल्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलतज्ज्ञ विभागाकडून नाकारण्यात आले. यामुळे ही रुग्ण महिला औरंगाबाद येथे गेल्यावर तेथे देखील दोन कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नाकारल्याने हताश झालेल्या रुग्णाने जिल्हा रुग्णालयातील शस्रक्रिया विभागप्रमुख डॉ. किरण पाटील यांना भेटून संभाव्य दुष्परिणामांना सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय झाला. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर संघटनेचे सदस्य कॅन्सरतज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक यांनी डॉ. पाटील यांच्या मदतीने अवघड शास्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. साधारण साडेतीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये कमी रक्तस्त्राव होऊन एकही दुष्परिणामाना सामोरे जावे लागले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com