सिंचनासाठी 3400 कोटी मिळविण्यास प्राधान्य : उन्मेष पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

जळगाव : खासदार म्हणून आता सेवेचे कार्यक्षेत्र वाढलेय अन्‌ जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे लोकसभेत प्रतिनिधित्व करताना आता पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याला "सुजलाम्‌- सुफलाम्‌' करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी "नाबार्ड टप्पा-2'च्या माध्यमातून "पाडळसरे', "भागपूर' व "पद्मालय' या तीन प्रकल्पांसाठी तातडीने सुमारे 3400 कोटींचा निधी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती जळगावचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. 

जळगाव : खासदार म्हणून आता सेवेचे कार्यक्षेत्र वाढलेय अन्‌ जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे लोकसभेत प्रतिनिधित्व करताना आता पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्याला "सुजलाम्‌- सुफलाम्‌' करण्यासाठी अपूर्ण सिंचन प्रकल्पांसाठी "नाबार्ड टप्पा-2'च्या माध्यमातून "पाडळसरे', "भागपूर' व "पद्मालय' या तीन प्रकल्पांसाठी तातडीने सुमारे 3400 कोटींचा निधी मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती जळगावचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी दिली. 
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर उन्मेष पाटील यांनी आज औद्योगिस वसाहतीतील "सकाळ'च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी "कॉफी विथ सकाळ' या उपक्रमांतर्गत त्यांनी आगामी पाच वर्षांतील विकासाचे "व्हिजन' मांडले. तत्पूर्वी, खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. तासाभराच्या या संवादात खासदार पाटील यांनी त्यांच्या मनातील विकासाच्या संकल्पना मांडल्या. 

जिल्ह्यात 25 टक्केच सिंचन 
शेती समृद्ध झाली, तर गावे विकसित होतील आणि गावांचा विकास झाला, तर पर्यायाने शहरे व राज्याचा विकास होऊ शकतो. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी काम करण्यावर आपला भर राहीन, असे सांगताना खासदार पाटील म्हणाले, की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकीकडे पश्‍चिम महाराष्ट्राची शेती शंभर टक्के सिंचनाखाली येऊ शकली. मग, खानदेशची शेती का नाही? जळगाव जिल्ह्यात तर आजही केवळ 25 टक्के जमीनच सिंचनाखाली आहे. उर्वरित शेती निसर्गावर अवलंबून आहे. पाणीच नसल्यामुळे या क्षेत्राच्या विकासाला मर्यादा आल्या. 

3400 कोटींसाठी प्रयत्न 
जळगाव मतदारसंघातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर या पाच वर्षांत विशेष भर देण्यात येणार असल्याचे खासदार पाटील म्हणाले. अमळनेर तालुक्‍यातील पाडळसरे प्रकल्पाला केंद्रीय जलआयोगाची मान्यता नसल्याने निधी मिळू शकला नव्हता. आता आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पास चालना मिळू शकेल. 2751 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून, या प्रकल्पासाठी 1700 कोटींचा निधी एकरकमी मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तसेच जळगाव तालुक्‍यातील भागपूर प्रकल्पासाठी 1500 कोटी व पद्मालय सिंचन प्रकल्पासाठी 200 कोटींचा निधी येत्या काही महिन्यांत मिळेल, असे प्रयत्न सुरू आहेत. 

"नाबार्ड'कडून घेणार अर्थसहाय्य 
"नाबार्ड'ने आधी मंजूर केलेल्या निधीत या प्रकल्पांचा समावेश होऊ शकला नव्हता. आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून "नाबार्ड टप्पा-2'अंतर्गत या तिन्ही प्रकल्पांसाठी सुमारे 3400 कोटींचा निधी मिळवून देऊ. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रातील सुमारे एक लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, वरखेड- लोंढे, बलून बंधाऱ्यांचा प्रकल्पही अग्रक्रमाने पूर्ण करण्यावर भर राहीन, असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coffy with sakal unmesh patil