संघर्षयात्रा आणेल कॉंग्रेसमध्ये चैतन्य..? 

संघर्षयात्रा आणेल कॉंग्रेसमध्ये चैतन्य..? 

जळगाव : फैजपूरमध्ये 1936 या वर्षी कॉंग्रेसचे देशातील पहिले ग्रामीण अधिवेशन घेण्यात आले. यात देशातील शेतकरी आणि शेतमजुरांबाबत ठराव पक्के करण्यात आले. याच ऐतिहासिक भूमीतून कॉंग्रेस उद्या (ता. 4) पुन्हा देशातील शेतकरी व तरुणांसाठी संघर्षयात्रा सुरू 

जनतेला केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील फडणवीस सरकारने दिलेल्या भूलथापांबाबत जनजागृती करण्यासाठी या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा फैजपूरपासून सुरू होत आहे. या यात्रेनिमित्त जिल्ह्यातील अंतर्गत वादातच गुंतलेल्या कॉंग्रेसला एकसंध करून आगामी निवडणुकीत बळ मिळाले, तर खऱ्या अर्थाने ही यात्रा ऐतिहासिक ठरणार आहे. 

कॉंग्रेसला ग्रामीण चेहरा देण्यात फैजपूर कॉंग्रेस अधिवेशन महत्त्वाचे ठरले होते. कॉंग्रेस स्थापनेनंतर फैजपूरपूर्वी झालेले सर्वच अधिवेशन शहरी भागात झाले होते. मात्र, सन 1936 मध्ये फैजपूर या ग्रामीण भागात कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू अधिवेशनाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, खान अब्दुल गप्फार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांच्यासह तत्कालीन अनेक राष्ट्रीय नेते या अधिवेशनास उपस्थित होते. त्यावेळी या अधिवेशनात शेतकरी आणि शेतमजुरांबाबतचे ठरावही करण्यात आले होते. या अधिवेशनानंतर कॉंग्रेस ग्रामीण भागातील प्रश्‍नांनाही जाणते, हा संदेश शेतकरी आणि शेतमजुरांत गेला आणि तेथून कॉंग्रेसला ग्रामीण स्तरावरही अधिकच बळ मिळाले होते. 

याच ऐतिहासिक भूमीतून देशातील शेतकरी आणि शेतमजूर तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नावर उद्यापासून राज्यातील कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू होत आहे. त्यामुळे या यात्रेला एक वेगळेच महत्त्व आहे. जनतेच्या प्रश्‍नासाठी निघालेली यात्रा निद्रावस्थेत असलेल्या जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्येही चैतन्य निर्माण करणारी ठरावी, अशी कॉंग्रेसजनांची इच्छा आहे. जळगाव जिल्हा एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. खासदार, आमदार कॉंग्रेसचे होते. जिल्हा परिषद, पालिका तसेच ग्रामपंचायती, सहकारी संस्थांवर सत्ता कॉंग्रेसचीच होती. याच जिल्ह्यातील कॉंग्रेसने प्रतिभाताई पाटील यांच्या रूपात देशाला राष्ट्रपती दिल्या. मात्र, आज जिल्ह्यात कॉंग्रेस नावापुरती उरली आहे. खासदार, आमदार तर नाहीतच, परंतु जिल्हा परिषदेत फक्त चार सदस्य आहेत, तेही केवळ नावालाच... 

जिल्ह्याच्या ठिकाणी जळगाव महापालिकेत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक नाही. जिल्ह्यातील सहकारी संस्थांपासून तर कॉंग्रेस केव्हाच दूर गेली आहे. या शिवाय पक्षाचे संघटनही गेल्या अनेक वर्षांपासून कमकुवत झाले आहे. अर्थात त्यासाठी अध्यक्ष किंवा पदाधिकाऱ्यांनाच जबाबदार धरून चालणार नाही. त्यासाठी अगदी राज्य स्तरापासून सर्वच पातळ्यांवर पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष हे महत्त्वाचे कारणही आहे. सत्ता असताना वरिष्ठ स्तरावरून जिल्हा कॉंग्रेसकडे आणि अंतर्गत वाद मिटविण्याकडेही लक्ष दिले गेले नाही. अर्थात कोळसा कितीही उगाळला, तरी तो काळाच निघणार आहे. त्यामुळे तो उगाळत बसण्यापेक्षा आता जनसंघर्ष यात्रेनिमित्ताने का होईना देशातील आणि राज्यातील नेते जिल्ह्यात येत आहे. त्यांनी पक्षाला बळ देण्यासाठी थोडे प्रयत्न केल्यास आगामी निवडणुकीत त्याचे फलित दिसून येईल आणि स्वातंत्र्यानंतर जळगाव जिल्ह्यातील कॉंग्रेससाठी ही जनसंघर्ष यात्रा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com