नंबर येण्यापूर्वीच मका खरेदी लॉक; अडीचशे क्विंटल शेतकऱ्यांच्या घरात पडून 

जगन्नाथ पाटील   
Monday, 10 August 2020

शेतकऱ्यांची मागणी आणि लोकप्रतिनिधींचा रेटा यामुळे पुन्हा खरेदीस मान्यता मिळाली. साडेसहा लाख नव्या खरेदीस परवानगी मिळाली. चार पाच दिवस खरेदी झाल्यानंतर बारदान संपले. ते उशिरा मिळाले.  

कापडणे  : मार्चपासून घरात अडीचशे क्विंटल मका पडून आहे. त्यात उंदीर, घुसा आणि खारुताई दंगा मस्ती करू लागल्या आहेत. पणन संघ खरेदी करेल. म्हणून नोंदणी केली. माझा नऊशे पंधरावा क्रमांक येण्याधीच खरेदी लॉक झाली. आता पाच महिने सांभाळलेल्या मक्याचे लोणचे टाकायचे की, शेण खतात मिसळायचे? असा सवाल उद्विग्नतेने युवा शेतकरी राजा पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

पणन महासंघाने धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या चारही तालुक्यात मका खरेदी केंद्रे सुरु केलीत. पूर्वी अडीच लाख क्विंटल खरेदीस परवानगी मिळाली होती. ती पूर्ण झाल्यानंतर खरेदी केंद्र बंद पडले होते. शेतकऱ्यांची मागणी आणि लोकप्रतिनिधींचा रेटा यामुळे पुन्हा खरेदीस मान्यता मिळाली. साडेसहा लाख नव्या खरेदीस परवानगी मिळाली. चार पाच दिवस खरेदी झाल्यानंतर बारदान संपले. ते उशिरा मिळाले.  पुन्हा खरेदी सुरू झाली. तरीही पन्नास टक्केही खरेदी झाली नाही. सुमारे दोन हजार शे‍तकऱ्यांनी नोंदणी केली आहे. केवळ साडेचारशे शेतकऱ्यांकडूनच मका खरेदी होऊ शकला. पुन्हा वाढीव मुदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होवू लागली आहे. 
दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अद्यापही किमान दहा लाख क्विंटल मका खरेदी अभावी पडून आहे. 

खरेदी अभावी मका पडून 
पणन महासंघाकडे ऑनलाइन नोंदणी केली. नऊशे पंधरावा क्रमांक होता. चारशे पन्नासाव्या क्रमांकावर खरेदी बंद झाली. पणन खरेदी करेल. या आशेवर पाच महिने मका घरात पडून आहे. आठ एकरमधून उत्पादित रब्बीचा मका अडीचशे क्विंटल पडून आहेच.खरिपाचा किमान दोनशे क्विंटल मका येणार आहे. दीडशे क्विंटल उन्हाळी कांदाही भाव अभावी पडून आहे. 

शासन कोणाचेही येवो. शेतकऱ्यांसाठी कोणताही कायदा तयार केला तरी तो कागदावरच राहतो. त्याचा उपयोग होत नाही. मका खराब होतोय. तर चाळीतील कांद्यातील सडमुळे दुर्गंधी वाढली आहे. शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण असते. हे पटू लागले आहे. 
-राजा पाटील, युवा शेतकरी, कापडणे 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corn two hundred and fifty quintals farmer house lying

Tags
टॉपिकस
Topic Tags: