विशेष पोलिस अधिकाऱ्यांच्या "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर नियुक्‍त्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

संबंधित पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत नेमणूक झाल्यावर त्यांची इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित हजेरी होऊन इतर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

जळगाव :  "कोरोना'चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, गर्दीवर नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलातील मनुष्यबळ कमी पडत असल्याने आता जनतेतून विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना प्राप्त अधिकारान्वये उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात आवश्‍यकतेनुसार जनतेतून विशेष पोलिस अधिकारी नियुक्तीचे आदेश पारीत केले आहेत. 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...कोरोनाग्रस्तांची संख्या एकतीसवर ! 
 

पोलिस अधीक्षकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार "कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम-1951 च्या कलम-21(1)नुसार जिल्हा पोलिस अधीक्षकांना प्राप्त विशेष अधिकारातून जनतेतून विशेष पोलिस अधीकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. पोलिस ठाणेनिहाय वय वर्षे 18 ते 50 वयोगटातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, एन.एस.एस किंवा एन.सी.सी.चे प्राध्यापक व अधिकारी, सिव्हिल डिफेन्स अधिकारी, स्वयंसेवक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिक, सामाजिक बांधिलकी असणारे नागरिक (गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेले) अशांची विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

क्‍लिक कराः त्या' कोरोनाबाधिताने दिला खोटा पत्ता 
 

संबंधित पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत नेमणूक झाल्यावर त्यांची इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे नियमित हजेरी होऊन इतर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना जीवनावश्‍यक वस्तू खरेदी-विक्रीचे ठिकाण, बॅंका, रेशन दुकान, गस्त, जनजागृतीसाठी नियुक्त करण्यात येणार असून, कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्याकडून कामे करवून घेण्याची जबाबदारी संबंधित प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांची असेल. उपविभागीय अधिकारी नियमितपणे त्याचा अहवाल आणि कामावर नियंत्रण ठेवणार आहेत. 

नक्की वाचा :जोशीपेठेत साडेचार हजार नागरिकांची तपासणी 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona background Appointments of special police officers