जळगावचा मृत्यूदर देशात सर्वाधिक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

"कोविड'च्या रुग्णांनुसार त्यांचा मृत्यूदर काढता येत नाही. आतापर्यंत रुग्णालयातील "कोविड' विलगीकरण कक्षात दाखल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन जणांना मृतावस्थेतच रुग्णालयात दाखल केले होते. उर्वरित मृत व्यक्ती वृद्धावस्थेतील असून, त्यातील बहुतांश जणांना अन्य व्याधी जडलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. 
- डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव 

जळगाव : गेल्या 20 दिवसांत जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 45वर गेला. त्यातही 12 जणांच्या मृत्यूने जिल्ह्याचा मृत्यूदर तब्बल 30 टक्के असून, तो राज्यात काय पण देशात अव्वल असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या मृत्यूदराने एकीकडे प्रशासनाची चिंता वाढवली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, किंबहुना हे या आरोग्य यंत्रणेचे अपयशच असल्याचे बोलले जात आहे. 

नक्‍की पहा - "आरोग्य सेतु ऍप' पाकिस्थानी हॅकर कडून हॅक? 
 

सेफ जिल्हा बनला "रेड झोन' 
मुळात 18 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात केवळ दोन रुग्ण (जळगाव शहरात) आढळले होते, पैकी एकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा पूर्ण बरा होऊन घरी परतला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढून ती पन्नाशीकडे कूच करू लागली आहे. दुसरीकडे कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही खूप आहे. आजपर्यंत निष्पन्न 45 पैकी 12 रुग्ण दगावले असून, हे प्रमाण तब्बल 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. देशातील मृत्यूदर 3 टक्के, राज्याचा 4 ते 5 टक्के असताना जळगाव जिल्ह्यात तो 30 टक्के हे प्रमाण चिंताजनक आहे. 

आरोग्य यंत्रणा कुचकामी 
हे आकडे पाहिले तर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमालीची अपयशी, कुचकामी ठरल्याचे दिसते. एक तर येथील आरोग्य सुविधा चांगल्या दर्जाच्या नाहीत आणि त्या चांगल्या असतील तर रुग्णाची योग्य काळजी घेतली जातेय की नाही, याबाबत शंका येण्यास वाव आहे. 

200 बेड, 8 व्हेन्टीलेटर 
जळगावच्या कोविड रुग्णालयात कोरोनासाठी सध्या 200 बेड, तर अवघे 8 व्हेन्टीलेटर आहेत. रुग्णाच्या सेवेत 25 डॉक्‍टर्स, 150 सहकारी आहेत. पुरेसा औषधीसाठाही आहे, असे असताना कोरोनाचा मृत्यूदर इतका अधिक का, याबाबत कोणतीही यंत्रणा बोलायला तयार नाही, अशी स्थिती आहे. 
 

जे डॉक्‍टर "कोविड'चे रुग्ण हाताळत आहेत, तेच या रुग्णांच्या मृत्यूबाबत माहिती देऊ शकतील. मी अद्याप रुग्ण बघितलेच नसून, त्याबाबत काहीच सांगू शकत नाही. कोव्हीड रुग्णालय शासकीय महाविद्यालयांतर्गत असल्याने याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाताच माहिती देऊ शकतील. 
- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona death ratio high india country