परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 एप्रिल 2020

वाढीव लॉकडाउनच्या कालावधीत निवारागृहात असलेले राज्याच्या इतर जिल्ह्यांतील नागरिकांना त्यांच्या मूळगावी जायचे असल्यास तशी व्यवस्था करावी. परप्रांतातील नागरिकांबाबत शासनाच्या सूचना येईपर्यंत त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.

जळगाव : संपूर्ण देशभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, तरी देखील नागरिक हे आदेश झुगारून जिल्ह्यात येत आहे. अशा प्रकारे येणाऱ्यांची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. 

क्‍लिक करा - त्या निष्पाप दोन्ही चिमुकल्यांना नडले दारिद्रय...तरीही आई म्हणते माझा पती असा नाही हो... 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते. 

डॉ. ढाकणे म्हणाले, की वाढीव लॉकडाउनच्या कालावधीत निवारागृहात असलेले राज्याच्या इतर जिल्ह्यांतील नागरिकांना त्यांच्या मूळगावी जायचे असल्यास तशी व्यवस्था करावी. परप्रांतातील नागरिकांबाबत शासनाच्या सूचना येईपर्यंत त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. जळगाव येथील कोविड 19 रुग्णालयात सध्या 118 व्यक्ती दाखल आहेत. येथील परिस्थिती लक्षात घेता कोरानाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर तालुक्‍याच्या ठिकाणीच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात यावेत. तसेच आवश्‍यकता भासत असल्यास त्यांना तिथेच ऍडमिट करून घ्यावे. ज्या व्यक्तींना सामाजिक क्वारंटाईन करावयाचे आहे, त्यांनाही तालुक्‍याच्या ठिकाणी ठेवावे. त्यांना कोविड रुग्णालयात आणू नये. 

नागरिकांनी सजग राहावे 
जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी जिल्ह्याच्या तपासणी नाक्‍यांना भेटी देवून त्या ठिकाणावरील परिस्थिती जाणून घेतली. आपल्या शेजारील जिल्ह्यांमध्ये "हॉटस्पॉट' निर्माण झाले असल्याने त्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे अमळनेर, पारोळा, चाळीसगाव या तालुक्‍यांतील नागरिकांनी अधिक सजग राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 

अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई 
परजिल्ह्यातून कोणीही आपल्या जिल्ह्यात आला, तर ज्या मार्गाने ती व्यक्ती आली असेल, त्या मार्गावरील बंदोबस्तात असलेल्या अधिकाऱ्यांसोबतच त्या गावातील पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशाराही डॉ. ढाकणे यांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona other district coming police case