esakal | धोक्‍याची घंटा..: ना "ट्रॅव्हल्स हिस्ट्री', ना कुणाशी संपर्क !
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रशासन व यंत्रणा ऍलर्टवर आहे. आता या रुग्णाला संक्रमण कसे झाले, त्या प्रसारकाचा शोध सुरू झाला आहे. हा रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

धोक्‍याची घंटा..: ना "ट्रॅव्हल्स हिस्ट्री', ना कुणाशी संपर्क !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सालारनगर येथील साठ वर्षीय रुग्णाचा कोरानामुळे आज मृत्यू झाला. सालारनगर येथे निवासस्थान ते जोशीपेठेतील गोदाम असाच त्याचा रोजचा प्रवास. त्या रुग्णाची कुठलीही विदेशातील प्रवासाची पार्श्‍वभूमी नाही. तरीही त्याला कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण प्रशासन व यंत्रणा ऍलर्टवर आहे. आता या रुग्णाला संक्रमण कसे झाले, त्या प्रसारकाचा शोध सुरू झाला आहे. हा रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

कौटुंबिक पार्श्‍वभूमी अशी 
कुटुंबीय परिचितांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला रुग्ण केळीबागा खरेदी करणारे ठोक व्यापारी होता. त्याच्यासह तिन्ही भाऊ वेगवेगळे राहतात तर या रुग्णास तीन मुले, सुना असा मोठा परिवार. ते मोठ्या मुलासह सालारनगरात वास्तव्यास आहेत. त्याच्या पत्नीही वयोवृद्ध असून पलंगावर खिळून असतात. तीन दिवसांपूर्वी हा व्यापारी चक्कर येऊन पडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर बुधवारी (ता. 1) रात्री त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू असताना चोवीस तासातच त्यांचा मृत्यू ओढवला. 

मधुमेह, रक्तदाबाने ग्रस्त 
मृत कोरोनाग्रस्त रुग्णास मधुमेहासह उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यावर बायपास सर्जरीही झालेली होती. म्हणून त्यांच्यावर सतत वैद्यकीय उपचार सुरू होते. घरात पत्नी आजारी, स्वतःही आजारपण भोगत असल्याने बाहेर कुठे येणे-जाणेच शक्‍य नसल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. 
 
धोक्‍याचा इशारा.
संबंधित रुग्णाचे कुटुंबीय आणि नातलगांच्या माहितीनुसार त्यांना कुठलीही "ट्रॅव्हल्स हिस्ट्री' नाही. विदेशात, अन्य जिल्ह्यातही त्यांनी प्रवास केलेला नाही. कुठल्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातही ते आल्याची माहिती मिळत नाही. याआधी मेहरुणमधील जो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्याच्याशीही या रुग्णाची ओळख नाही. अज्ञात प्रसारकाकडून त्यांना लागण झाल्याचे सध्याचे चित्र धोक्‍याचा इशारा देणारे आहे. ही स्थिती "कम्युनिटी स्प्रेड'चा प्रत्यय दर्शविते, असेही बोलले जात आहे. 
 
मृताच्या कुटुंबातील 17 जण क्‍वारंटाइन 
कोरोना बाधित झालेल्या मृताच्या कुटुंबीयांसह त्याच्या संपर्कात असलेल्या 17 जणांसह इतर 3 जणांना जिल्हा प्रशासनाने क्‍वारंटाइन केले आहे. यामध्ये लहानबालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचा समावेश आहे. या सर्व 20 संशयितांचे नमुने धुळे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या सर्वांचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.
 

loading image