"कोरोना' संशयित मृत्यूच्या नोंदीबाबत संभ्रम कायम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मे 2020

कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर संबंधित पावतीवर मृत्यूच्या कारणाची योग्य नोंद केल्यास मृतदेहावरील अंत्यसंस्कार मार्गदर्शक सूचनांनुसार होऊ शकतील. त्यासाठी जिल्हा रुग्णालय व अन्य खासगी हॉस्पिटलने याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. 

जळगाव : अमळनेरमधील साळीवाड्यातील महिलेचा "कोरोना'चा अहवाल "पॉझिटिव्ह' येण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पण, या महिलेला न्यूमोनिया झाल्याचे प्रमाण "कोरोना हॉस्पिटल'कडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेकडून मृत्यूच्या नोंदीबाबत सर्व हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालयातही पावती पुस्तक दिले जाते. त्यावर मृत्यूच्या कारणाचीही नोंद असते. त्यामुळे कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला तर संबंधित पावतीवर मृत्यूच्या कारणाची योग्य नोंद केल्यास मृतदेहावरील अंत्यसंस्कार मार्गदर्शक सूचनांनुसार होऊ शकतील. त्यासाठी जिल्हा रुग्णालय व अन्य खासगी हॉस्पिटलने याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. 

आवर्जून वाचा - दुर्दैवी घटना : खेळत होता झोका...अन्‌ असे घडले भयंकर ! 
 

अमळनेर तालुक्‍यात "कोरोना'चे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे हा तालुका "हॉटस्पॉट' ठरला आहे. केवळ एका चुकीमुळे जिल्हा "रेड झोन'मध्ये गेला असून, यात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा दोष असल्याचे उघड झाले आहे. कारण, अमळनेरच्या साळीवाड्यातील दाम्पत्याला "कोरोना'सदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांना 18 एप्रिलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यात महिलेचा 19 एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता; परंतु "कोरोना'चा अहवाल प्रलंबित असताना महिलेचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याची नोंद पावतीवर केल्याने कुटुंबीयांना देऊन तिचा मृतदेह स्वाधीन करत अंत्यसंस्कार करण्याचे सांगितले होते. या एका चुकीमुळे अमळनेरमध्ये "कोरोना'चा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. 

मनपाचे पावतिपुस्तक प्रत्येक रुग्णालयात 
महापालिका हद्दीत असलेल्या शासकीय तथा सर्व खासगी रुग्णालयांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावती पुस्तके दिलेली असतात. अर्थात, महापालिका हद्दीत होणाऱ्या जन्म- मृत्यूची नोंद या पावतीच्या आधारावरून होत असते. अशाच प्रकारचे पावती पुस्तक "कोविड हॉस्पिटल' अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही आहे. तेथून कोरोना संशयित म्हणून कुणी दगावत असेल तर त्या पावतीवर मृत्यूच्या कारणाची कोरोना संशयित म्हणून नोंद होणे गरजेचे आहे. याबाबत मनपा स्थायी समिती सभापती शुचिता हाडा यांनी मनपा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona suspected death resishterd corporation book