कोरोनामुळे शाळांना सुट्या..पण यांच्या झाल्या सुट्या रद्द 

उमेश काटे
Friday, 1 May 2020

जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्व्हेक्षण करून कोणी आजारी आहे का, बाहेर गावाहून कोणी गावात आले आहे का,होम क्वारंटाईन व्यवस्थित पाळले जात आहे

अमळनेर : राज्यात कोरोनाची साथ असल्याने व या साथीचे सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनिसांवर सोपवली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आली असल्याचे पत्र एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त इंद्रा मालो (नवी मुंबई) यांनी काढले आहेत.

आवर्जून वाचा - दुर्दैवी घटना : खेळत होता झोका...अन्‌ असे घडले भयंकर ! 

राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रूग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. म्हणून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे आणि अनेक जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्व्हेक्षण करून कोणी आजारी आहे का, बाहेर गावाहून कोणी गावात आले आहे का,होम क्वारंटाईन व्यवस्थित पाळले जात आहे का तसेच आरोग्य विषयक माहिती संकलन करण्याचे काम केले जात आहे.अजूनही पुढे सर्व्हेक्षणाचे हे काम सुरू राहणार आहे.कोरोनाचे काम करत असतांनाच त्यांना त्यांचे नियमित आहार वाटपाच्या कामाची जबाबदारी आहे. टीएचआर व गरमा ताजा आहार घरपोच वाटपाचे काम सुरु असल्याने  साथ आटोक्यात येईपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्या केल्या आहेत.दरवर्षी या कर्मचाऱ्यांना मे महिन्यात १ ते १५ मे एक कर्मचारी व १६ ते ३१ मे पर्यंत दुसरा  कर्मचारी अशा आळीपाळीने सुट्टी दिली जाते.अंगणवाडी सेविका मदतनिसांची सुट्टी सद्या रद्द करण्यात आली आहे मात्र साथ आटोक्यात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना आळीपाळीने सुट्टी घेण्याची परवानगी देण्याबाबतही सुचना केल्या आहेत.परंतु एकाच वेळी दोन्ही कर्मचाऱ्यांना सुट्टी देता येणार नसल्याचे आयुक्तांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

एकीकडे कोरोनामुळे अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. तर काही घरी सुरक्षित राहत आहे. मात्र अंगणवाडी सेविका व मदतनीस कोरोनाच्या युध्दात पुढे सरसावल्या आहेत. नियमितपणे जास्तीचे काम झाल्यानंतर स्वाभाविक पणे सुट्टी देणे आवश्यक होते. मात्र शासनाने उन्हाळी सुट्टी रद्द केल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
- रामकृष्ण पाटील, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus anganwadi sevika holiday cancal