गरजू परिवारांना देणार वीस दिवसांची भोजनसामुग्री...करा संपर्क

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

संचारबंदीमुळे रोज काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून परिवाराचे पोट भरणारे अत्यंत चिंतेत व विवंचनेत आहेत. हातावर पोट घेऊन जगणारा, रोजंदारीवर गुजराण करणारा हा वर्ग अत्यंत भेदरलेला आहे. त्यांची भुक भागविण्यासाठी भरारी फाउंडेशन व के. के. कॅन्सने पुढाकार घेतला आहे. 

जळगाव ः कोरोना व्हायरसमुळे सध्या स्थिती खुप भयावह झालेली आहे. सर्वच बंद झाल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. मजुरी करून दोन वेळची भुक भागविणाऱ्याची स्थिती याहून बिकट. कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आणली असून, घरातच थांबून रहावे लागत असल्याने भुक भागवायची कशी? हा मोठा प्रश्‍न उभा आहे. अशा हातमजुरी करून पोट भरणाऱ्या शंभर परिवारांचे पोट भरण्याची सोय करण्याच्या उद्देशाने शंभर कुटूंबांना वीस दिवस पुरेल इतकी भोजनसामुग्री पुरविण्यात येणार आहे. 
जगात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशात देखील ही परिस्थिती निर्माण झाली असून, कोरोनामुळे परिस्थिती अधिक वाईट होवू नये; याकरीता देशात 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे रोज काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून परिवाराचे पोट भरणारे अत्यंत चिंतेत व विवंचनेत आहेत. हातावर पोट घेऊन जगणारा, रोजंदारीवर गुजराण करणारा हा वर्ग अत्यंत भेदरलेला आहे. त्यांची भुक भागविण्यासाठी भरारी फाउंडेशन व के. के. कॅन्सने पुढाकार घेतला आहे. 

शंभर कुटूंबांना देणार साहित्य 
शहरात वास्तव्यास असलेले परंतु, मिळेल ते काम करून पोट भरणारे अनेक कुटूंब आहेत. यातील गरजू अर्थात एक वेळचे जेवण मिळणे देखील कठीण असेल अशा शंभर कुटूंबांना भोजन सामुग्रीचा पुरवठा केला जाणार आहे. माणुसकीचा एक धागा पकडत भरारी फाउंडेशन व के. के. कॅन्सकडून पुढील वीस दिवस पुरेल एवढी जीवनावश्‍यक भोजन सामग्री 100 गरीब, गरजू परिवारंपर्यंत पोचवत आहे. याकरीता नवजीवन प्रॉव्हिजनचे देखील "ना नफा ना तोटा' या तत्वावर सामग्री देऊन सहभागी आहे 

एक आवाहन 
आर्थिक बाजू लंगडी होऊन जर कोणी उपाशी मरणार असेल तर ते पाप सगळ्यांच्या माथी जाईल. असं होऊ नये म्हणून सगळ्यांनी पुढे येणं गरजेचे आहे. यामुळे आपल्या आसपास महितीतले कुणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या दृष्टीने जर असे परिवार माहीत असतील ज्यांना खरंच खूप गरज आहे. त्यांची माहिती संपर्क साधून कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकरीता दीपक परदेशी (9970569942), रामचंद्र पाटील (7588054273), चंद्रशेखर नेवे ( 8208633840), आयुष मणियार (8888361389), योगेश हिवरकर (8459570388) किंवा भरारी फाऊंडेशन (नटवर कॉम्प्लेक्‍स पहिला मजला, जळगाव) येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus bharari foundetion help hundred family