esakal | रक्‍तपेढ्यांमधील स्टॉक मर्यादित दिवसांचा!

बोलून बातमी शोधा

blood stock

अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आवश्‍यकता पडणाऱ्या रक्‍ताचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. रक्‍तपेढ्यांमध्ये सद्य:स्थितीला असलेला स्टॉक हा मर्यादित दिवसांचा म्हणजे पुढचे आठ दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याने पुढील काही दिवसांत रक्‍त उपलब्ध होण्यात अडचणी येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

रक्‍तपेढ्यांमधील स्टॉक मर्यादित दिवसांचा!
sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : "रक्‍तदान हेच जीवनदान...' हे घोषवाक्‍य घेऊन संस्था, संघटनांकडून शिबिरे घेतली जातात. तसेच अनेक दाते उत्स्फूर्तपणे रक्‍तदान करत असतात. परंतु या साऱ्या प्रक्रियेला विराम लागला असल्याने शहरातील रक्‍तपेढ्यांमधील स्टॉक मर्यादित दिवसांचा राहिला आहे. अर्थात जास्त मागणी झाल्यास रक्‍त पिशवीसाठी फिरावे लागणार आहे. 

क्‍लिक करा -कोरोनाचा पहिला गुन्हा दाखल


कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, यामुळे सर्वच ठिकाणी अर्थव्यवस्था कोलमडली आहे. इतकेच नाही तर कोरोनामुळे सर्वच बाबींवर परिणाम जाणवू लागला आहे. परंतु, अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी आवश्‍यकता पडणाऱ्या रक्‍ताचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. रक्‍तपेढ्यांमध्ये सद्य:स्थितीला असलेला स्टॉक हा मर्यादित दिवसांचा म्हणजे पुढचे आठ दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याने पुढील काही दिवसांत रक्‍त उपलब्ध होण्यात अडचणी येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 
 
शिबिर रद्दने समस्या 
साधारणपणे उन्हाळ्यात रक्‍ताचा तुटवडा जाणवत असतो. यंदा मात्र उन्हाळ्यापूर्वीच कोरोना व्हायरसमुळे तुटवडा जाणवू लागला आहे. आठ दिवस पुरेल इतका स्टॉक शहरातील रेडक्रॉस सोसायटी व गोळवलकर रक्‍तपेढीमध्ये शिल्लक आहे. मुळात मार्च- एप्रिलमध्ये होणारे रक्‍तदान शिबिर रद्द झाल्याने हा परिणाम जाणवू लागला आहे. गोळवलकर रक्‍तपेढीतर्फे होणारे नऊ शिबिर रद्द झाले आहेत. यामुळे सद्य:स्थितीला गोळवलकर रक्‍तपेढीत आठवडाभर पुरेल इतका स्टॉक आहे. त्यात देखील "ए' पॉझिटिव्ह आणि "एबी' पॉझिटिव्हचा स्टॉक दोन दिवस पुरेल इतकाच आहे. तर रेडक्रॉसमध्ये 31 मार्चपर्यंत पुरेल इतका स्टॉक आहे. 

रक्‍तदात्यांशी संपर्क 
कोरोना व्हायरसमुळे रक्‍तपेढ्यांमधील साठ्यावर परिणाम होत असला, तरी रक्‍ताची आवश्‍यकता असल्यास रक्‍तदात्यांशी थेट संपर्क साधून बोलावण्यात येत आहे. म्हणजे ज्या रक्‍तगटाची मागणी असेल, त्यानुसार रक्‍तदात्याला फोन करून बोलावण्याचे काम "रेडक्रॉस'कडून सुरू आहे. तर रक्‍तदानाने कोरोना होत नसल्याचा संदेश गोळवलकर रक्‍तपेढीकडून रक्‍तदाते व नागरिकांपर्यंत पोहचविले जात आहेत. 

रक्‍तपेढीमुळे 31 मार्चपर्यंत पुरेल इतका साठा असून, गरजेनुसार रक्‍तदात्यांशी संपर्क करून बोलावले जात आहे. शिवाय उन्हाळ्यात तुटवडा जाणवणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. 
- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, रेडक्रॉस रक्‍तपेढी

आठ दिवस पुरेल इतका स्टॉक रक्‍तपेढीत आहे. रक्‍तपेढीच्या माध्यमातून महिनाभरात नियोजित असलेली नऊ शिबिरे रद्द झाल्याने तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. 
- पवन येपुरे, जनसंपर्क अधिकारी, गोळवलकर रक्‍तपेढी