esakal | आणि लग्नाची तारीख लोटली पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

लग्नसोहळा वधू-वर पक्षांकडील मंडळींनी रद्द करून लग्नतारीख पुढे ढकलून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ठाकणेंच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. 

आणि लग्नाची तारीख लोटली पुढे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जगभरात "कोरोना व्हायरस'ने थैमान घातले असून, त्याचे सर्वाधिक संशयीत महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यामुळे लग्नसोहळे व गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने उद्या (22 मार्च) होणारा लग्नसोहळा वधू-वर पक्षांकडील मंडळींनी रद्द करून लग्नतारीख पुढे ढकलून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ठाकणेंच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. 

नक्‍की वाचा - ताई साखळी सापडलीय...तुमची आहे का? म्हणत केली परत


शहरातील मेहरुण परिसरातील पांडुरंग त्र्यंबक सोनवणे यांचे पुत्र प्रशांत यांचा लग्नसोहळा सुरतमधील डिंडोली येथील विनोद जाधव यांची कन्या प्रियासोबत उद्या (22 मार्च) एमआयडीसी परिसरातील अजिंठा लॉनमध्ये पार पडणार होता. परंतु देशभरात "कोरोना'ने थैमान घातल्याने खबरदारी म्हणून गर्दी होणारे कार्यक्रम व लग्नसोहळे रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले होते. दरम्यान, मेहरुण परिसरात लग्नसोहळा असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना माहिती होताच त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी व आनंदसिंग पाटील यांना सोबत घेऊन वराच्या वडिलांची भेट घेतली. या ठिकाणी त्यांनी लग्नसोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी वरपित्याची समजूतही काढली. त्यानंतर पांडुरंग सोनवेणे व विनोद जाधव या वधू-वर पक्षाच्या मंडळींनी एकमेकांसमवेत समन्वय साधून उद्या (22 मार्च) होणारा लग्नसोहळा रद्द करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

"ऍडव्हान्स' रक्कम केली परत 
वर पक्षाकडून लग्नसोहळ्यसाठी एमआयडीसी परिसरातील रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचे अजिंठा लॉन्स बुक केले होते. परंतु उद्या (22 मार्च) होणारा लग्नसोहळा रद्द करण्यात आल्याने सेवा ट्रस्टने घेतलेली संपूर्ण रक्कम वरपित्यास परत करून माणुसकी जोपासली आहे. 

"सोशल मीडिया'वरून नातेवाइकांना संदेश 
मेहरुण परिसरातील प्रशांत व प्रिया यांचा उद्या (22 मार्च) होणारा लग्नसोहळा स्थगित केल्याची माहिती प्रशांत व प्रिया यांच्या कुटुंबीयांनी "सोशल मीडिया'चा वापर करून संदेशाद्वारे संपूर्ण नातेवाइक, मित्र, आप्तेष्टांना दिली. त्यामुळे अनेकांनी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.