"कोरोना' युद्धात दिसेना लोकप्रतिनिधींचे नेतृत्व 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

समाजातील गरीब, कष्टकरी, गरजूंसाठी काही उपक्रम राबविले जाताना त्यात हे नेते दिसून येतात. मात्र, व्यापक जनजागृती, नागरिकांमध्ये जाऊन त्यांना जागृत करणे, "लॉकडाउन'च्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाला जाब विचारणे, बंदोबस्ताकडे लक्ष ठेवणे आदी प्रकार होताना दिसत नाही.

जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून "कोरोना'विरोधात शासन, प्रशासन आणि नागरिकांचे युद्ध सुरू आहे. पण एरवी कोणत्याही समस्या, प्रश्‍न वा उपक्रमावेळी आघाडीवर असलेले राजकीय नेते, पुढारी व पदाधिकारी सध्या या युद्धात कुठेही नेतृत्व करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. केवळ समाजातील गरीब, कष्टकरी, गरजूंसाठी काही उपक्रम राबविले जाताना त्यात हे नेते दिसून येतात. मात्र, व्यापक जनजागृती, नागरिकांमध्ये जाऊन त्यांना जागृत करणे, "लॉकडाउन'च्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रशासनाला जाब विचारणे, बंदोबस्ताकडे लक्ष ठेवणे आदी प्रकार होताना दिसत नाही. 

आवर्जून वाचा - खडसे समर्थकांचा हल्लाबोल...चंद्रकांतदादा मागे लपलेल्यांची वाक्‍ये बोलू नका...लोक हसतील ! 

राज्यातील काही भागांत आमदार, खासदार, महापालिका, पालिकांमधील पदाधिकारी स्वत: "कोरोना' युद्धातील वॉरिअरसमवेत खांद्याला खांदा लावून लढताना दिसतात. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका "कंटेन्मेंट झोन'मध्ये स्वत: जाऊन पोलिस यंत्रणा, बंदोबस्त कसा आहे, याचा आढावा घेतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. असे असताना जळगाव जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींचे अस्तित्वच जाणवत नसल्याचे चित्र आहे. त्यासंदर्भात नागरिकांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

निवडणुकांवेळीच समोर 
कोणत्याही प्रकारच्या निवडणुका असतील, तरच लोकप्रतिनिधी समोर दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर घरोघरी जाऊन प्रचार केला जातो. विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ मोठा असल्याने घरोघरी नाही, पण गल्लोगल्ली प्रचार होतो. लोकसभेला एकेक प्रभाग, वस्ती प्रचारादरम्यान लक्ष्य असते. पण "कोरोना' युद्धावेळी काही मोजके अपवाद वगळता बहुतांश लोकप्रतिनिधींचे "स्टे होम' सुरू असल्याचेच चित्र आहे. सोशल मीडियावरही आपल्या भागातील नगरसेवक, आमदार कुठे गेले? असे मेसेज फिरू लागले आहेत. 

नागरिक काय म्हणतात? 

लोकप्रतिनिधी घरातच 
नरेंद्र सोनवणे (पिंप्राळा) ः पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते रस्त्यावर येऊन नागरिकांना "कोरोना'त मदत करताना दिसतात. तसे आपल्याकडे आमदार, खासदार, नगरसेवक, नागरिक रस्त्यावर उतरून मदत करताना दिसत नाही. आमच्या घराकडे केवळ एकदा सॅनिटराइज करण्याचे मशिन आले. नंतर लोकप्रतिनिधींनी "कोरोना'बाबत जनजागृती केली ना "कोरोना'संदर्भात नागरिकांत काळजी घेण्याबाबत जागृती केली. वास्तविक जनजागृती करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचीही आहे. 

शेतकऱ्यांसाठी तरी रस्त्यावर यावे 
किशोर चौधरी (शेतकरी) ः शेतकऱ्यांचा कापूस तसेच इतर शेतमाल अजूनही घरात पडून आहे. महिनाभरापासून बाजार समित्यांत धान्य विक्री करता येत नाही. कापूस विक्री संथगतीने सुरू आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांच्या मालाला किमान बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न हवे होते. शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून असून, खरेदी केंद्रांची संख्या मोजकीच आहे. कापूस, धान्य विक्री न झाल्यास मोठे नुकसान होईल. शेतकऱ्यांचा माल विक्रीकरिता बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार, खासदार, पालकमंत्र्यांचा पुढाकार हवा. 
 
प्रशासनाच्या भरवशावर काम 
प्रा. उमेश वाणी ः "कोरोना'ला रोखण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सोबत मिळून काम करायला पाहिजे. जिल्ह्यात तसे दिसत नाही. केवळ प्रशासनच त्यांच्या परीने "कोरोना'ला अटकाव करण्यासाठी उपाय योजना करीत आहे. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक असावा. मात्र, लोकप्रतिनिधी "कोरोना'चा अटकाव करण्यासाठी नागरिकांना आवाहन करताना किंवा जनजागृती करताना दिसत नाही. "कोरोना' संसर्ग टाळण्यासाठी गर्दीत जाणे टाळायला हवे. यासाठी नागरिकांना विश्‍वासात घेण्याचे काम लोकप्रतिनिधी चांगल्याप्रकारे करू शकतील. परंतु ते करीत नाहीत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus ladha political leader not attach people