esakal | "कोरोना'चा प्रभाव..ठराविक औषधांच्या किमती दुप्पट 

बोलून बातमी शोधा

corona virus

चीनसह इतर 14 देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून, हजारो नागरिक कोरोनाचे बळी ठरले आहेत. तसेच या देशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, जनजीवन देखील विस्कळित झाले आहे.

"कोरोना'चा प्रभाव..ठराविक औषधांच्या किमती दुप्पट 
sakal_logo
By
अमोल कासार

जळगाव : चीनसह भारतात देखील "कोरोना'चे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून काळजी घेणे सुरू झाले आहे. चीनमधून इलेक्‍ट्रॉनिक्‍स, जीवनावश्‍यक वस्तूंसह औषधांसाठी लागणाऱ्या रसायनांची सर्वाधिक आयात केली जाते. परंतु, "कोरोना'मुळे तेथील मालावर भारताने बंदी घातली आहे. परिणामी, औषधांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. 

क्‍लिक करा - "कोरोना' व्हायरसमूळे जमावबंदी... शरद पवारांचा दौरा स्थगित

चीनसह इतर 14 देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले असून, हजारो नागरिक कोरोनाचे बळी ठरले आहेत. तसेच या देशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, जनजीवन देखील विस्कळित झाले आहे. चीनमधून क्रॉकरी, शोभेच्या वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, कंपनीमध्ये लागणाऱ्या मशिनरीसह औषधी तयार करण्यासाठी लागणारे एपीआय (ऍक्‍टीव फार्मास्युटिकल इन ग्रेडियन्ट) औषधाची सर्वाधिक आयात केली जाते. परंतु चीनमध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे तसेच या ठिकाणाहून निर्यात होणाऱ्या मालावर भारताने बंदी घातली आहे. त्यामुळे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. 

हेही पहा - "कोरोना' प्रतिबंधासाठी मनपा प्रशासन सज्ज! 

आठ हजारांहून लाखावर 
कुठलेही औषधी तयार करण्यासाठी ऍक्‍टीव फार्मास्युटिकल इन ग्रेडियन्ट या कच्च्या मालाचा (रसायनाचा) वापर केला जातो. हे कच्चे औषध (रसायनाचा) भारताला चीनकडून खरेदी करावे लागते. पूर्वी ऍक्‍टिव्ह फार्मास्युटिकल इन ग्रेडियन्ट या औषधाची खरेदी भारत 8 हजार रुपये किलोप्रमाणे करीत होता. परंतु, आता हे औषध खरेदी करण्यासाठी भारताला प्रतिकिलो 1 लाख रुपये मोजावे लागत असल्याने औषधांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असल्याने औषधांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 

मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत दहापट वाढ 
भारतात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये देखील जनजागृती होण्यास सुरवात झाली आहे. आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी नागरिक आतापासूनच सतर्क झाले आहे. त्यामुळे नागरिक तोंडाला बांधण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व थर्मामिटरची खरेदी करीत आहे. त्यामुळे या वस्तूंच्या मागणीत दहा पटीने वाढ झाली असून, त्यांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. 

"एन-95' मास्कचा वापर 
कोरोना व्हायरसची नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून मास्कची मोठी मागणी होऊ लागली आहे. यामध्ये औषधी दुकानांवर कापडी, पोल्यूशन यासह विविध प्रकारचे मास्कची विक्री केली जात आहे. परंतु, व्हायरसपासून बचाव करण्यासाठी "एन-95'चा वापर करण्याचा सल्ला वैद्यकीय सूत्रांकडून दिला जात आहे. त्यामुळे या मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

मास्कच्या किमतीत दुप्पट वाढ 
व्हायरसपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून मास्कची मोठी मागणी वाढली आहे. संपूर्ण देशभरातून मास्कला मागणी असल्याने कंपनीकडे मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मास्कच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये पूर्वी कापडी मास्क- 10 रुपये, पोल्यूशन मास्क-25 रुपये तर एन-95 मास्कची विक्री ही 100 रुपये प्रतिनगाप्रमाणे केली जात होती. परंतु आता मास्कच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ झाली असून, पूर्वी शंभर रुपयांना मिळणारे एन-95 हे मास्कची विक्री ही 250 रुपये नगाने होत आहे. 

थर्मामिटरसह नेबुलाईझरचीही मागणी वाढली 
सर्दी, खोकला, ताप येणे अंग दुखणे हा आजारातून कोरोनोच्या विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून आपली काळजी घेतली जात आहे. औषधी, मास्कसह नागरिकांकडून थर्मामिटर व नेबुलाईझरची (वाफ घेण्याचे मशिन) खरेदी केली जात आहे. पूर्वी 800 रुपयांना मिळणारे थर्मामिटर आता 1500 रुपयांना तर 1100 रुपयांना मिळणारे नेबुलाईझर (वाफ घेण्याचे मशिन) ची 1800 रुपयांना त्याची विक्री होत आहे. तसेच मास्कसह थर्मामिटर व नेबुलाईझरच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. 

मास्कचा वापर मर्यादित दिवसांसाठीच 
शहरात व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एन-95 मास्कची विक्री होत आहे. परंतु हे मास्कचा वापर हा काही दिवसांपुरताच मर्यादित असून, जास्तीत जास्त या मास्कचा वापर हा 20 दिवस करता येतो. त्यानंतर हे एन-95 मास्कचा वापर होत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 
 
सॅनिटायझर, हॅण्डवॉशचा वापर 
कोरोना हा संसर्गजन्य असून त्याचा प्रसार हा हस्तांदोलनातून होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिक देखील आपली काळजी घेत असून, बाहेरून आल्यानंतर हात धुण्यासाठी सॅनीटायझर व हॅण्डवॉशचा वापर करीत आहे. त्यामुळे औषधी दुकानांसह किराणा मालाची विक्री करणाऱ्या दुकानांमधून सॅनिटायझर व हॅण्डवॉशची विक्री होत आहे. 


मास्कसह सॅनिटायझर व हॅण्डवॉशची ग्राहकांकडून मोठी मागणी होऊ लागली आहे. या मास्कव्यतिरिक्त इतर वस्तूंचा अद्याप तुटवडा नाही. मात्र, येत्या काही दिवसांत या वस्तूंची मागणी कायम राहिल्यास त्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 
- प्रकाश सुपे, संचालक, नरेंद्र मेडिकल. 
 
भारताला आजही औषधी तयार करण्यासाठी कच्च्या रसायनांसाठी इतर देशांवर अवलंबूून राहावे लागते. यातील बहुतांश रसायन हे चीनमधून आयात केले जाते. परंतु, गेल्या महिन्याभरापासून याठिकाणाहून रसायनांची आयात बंद होती. तसेच ऍक्‍टिव्ह फार्मास्युटिकल इन ग्रेडियन्ट (एपीआय) हे रसायनाचा वापर प्रत्येक औषधांमध्ये होत असून, त्याच्या किमतीमध्ये दहापटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ होत आहे. 
- विनय चौधरी, संचालक, छाबडा एजन्सीज